अलिबाग (ओमकार नागावकर) : नागरिकांच्या महसुली अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर”चे आयोजन महसूल मंडळ चौल यांच्या वतीने करण्यात आले आहे... हे शिबीर शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता रेवदंडा येथील भंडारी समाज हॉल (रेवदंडा बीच शेजारी) येथे होणार आहे...
या शिबिरात नागरिकांना विविध महसुली सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत... प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ मधील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उतारे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्रे तसेच नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र मिळणार आहेत...
तसेच अकृषिक (NA) तरतुदींबाबत मार्गदर्शन, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजुरी, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले वाटप यासारख्या सेवा दिल्या जाणार आहेत... वर्ग २ जमिनीचे वर्ग १ मध्ये रूपांतर, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाच्या प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप आणि ई-मोजणी अर्ज यांचाही समावेश आहे...
याशिवाय ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी, तसेच भूसंपादन व अकृषिक परवानगी संदर्भातील पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्याचे कामही या शिबिरात होणार आहे...
या शिबिराला तहसिलदार विक्रम पाटील, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण आणि जिल्हाधिकारी किशन जावळे (भा.प्र.से.) यांची उपस्थिती राहणार आहे... नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे...
