अलिबाग - राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) विभागाच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी अलिबागमधील आरोग्य यंत्रणेला अचानक धक्का देत जिल्हा सामान्य रुग्णालयासह विविध आरोग्य केंद्रांवर ‘स्टिंग’ पद्धतीने पाहणी केली... या अनपेक्षित भेटीत रुग्णालयातील अस्वच्छता, ऑनलाइन कामकाजातील त्रुटी आणि रुग्णसेवेतील ढिसाळपणा उघडकीस आल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले...
आयुक्त बलकवडे यांनी दिवसाची सुरुवात अलिबाग तालुक्यातील धोकवडे, झिराड, आवास आणि किहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या भेटीने केली... त्यानंतर उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत, संथ गतीबाबत नाराजी व्यक्त करत कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले... यानंतर त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात थेट धडक देत विविध विभागांची सखोल पाहणी केली... ऑनलाइन सेवा प्रणाली तपासताना अनेक त्रुटी निदर्शनास आल्या... तसेच, रुग्णालय परिसरात साचलेल्या कचऱ्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली... स्टॉक बुक सेंटरसह इतर विभागांचीही बारकाईने तपासणी करण्यात आली...
रुग्णांशी थेट संवाद साधताना काहींनी सेवांबाबत समाधान व्यक्त केले, तर अनेकांनी गैरसोयी आणि दुर्लक्षाच्या तक्रारी मांडल्या... या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशीकांत पाटील यांना तत्काळ सुधारणा करण्याचे आदेश देत, रुग्णांना दर्जेदार आणि वेळेवर सेवा देण्याचे स्पष्ट निर्देश दिले... या अचानक ‘स्टिंग’ पाहणीमुळे रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, पुढील काळात आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे...
