प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक : तालुक्यातील मनसर येथील श्याम भारत गॅस एजन्सीला नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बीदरी यांनी शनिवार (दि.१४) मार्च रोजी आकस्मिक भेट देत एजन्सीच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन तसेच तहसील कार्यालय रामटेक येथील अधिकारी उपस्थित होते. पाहणीदरम्यान विभागीय आयुक्तांनी एजन्सीचे गॅस गोडाऊन, शोरूम तसेच प्लांटमधून येणाऱ्या एलपीजी सिलेंडरची साठवण आणि वितरण व्यवस्था प्रत्यक्ष तपासून पाहिली. ग्राहकांना सिलेंडर देताना बुकिंग, केवायसी (केवायसी ) प्रक्रिया तसेच आवश्यक तपासणीनंतरच वितरण होत असल्याची माहिती वितरक श्याम गायकवाड व त्यांच्या स्टाफकडून घेतली.. तसेच ग्राहकांना दिले जाणारे सिलेंडर योग्य वजन करूनच देण्यात येत असल्याचीही खात्री विभागीय आयुक्तांनी केली. इतर गॅस एजन्सींच्या तुलनेत येथे मागणी व पुरवठा व्यवस्थापन अत्यंत सुस्थितीत असल्याचेही त्यांनी नमूद केले... विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बीदरी यांनी श्याम भारत गॅस एजन्सीचे कामकाज, व्यवस्थापन तसेच ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त करत वितरक श्याम गायकवाड व संपूर्ण स्टाफचे कौतुक केले....
