महाराष्ट्र वेदभुमी

मुंबईतील गावठाण भागासाठी वाढीव fsi ची मागणी हिवाळी अधिवेशनात मांडली!

 मुंबई प्रतिनिधी :(सतीश पाटील): आमदार मुरजी पटेल यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात, मुंबईमधील गावठाण भागांच्या पुनर्विकासासाठी, तसेच आपल्या अंधेरीतील मरोळ, कोंदिविटा आणि गुंदवली या भागांना याचा लाभ मिळण्यासाठी एक खूप महत्वाचा मुद्दा मांडला...

मुंबईतील गावठाण भागांमधील शहराचे रहिवासी हे मूळ रहिवासी असून, मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे... मात्र, वाढत्या शहरीकरणाच्या प्रक्रियेत या गावठाण भागांचा पुनर्विकास आजही योग्य धोरणाअभावी प्रलंबित आहे, ही वस्तुस्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली...

याच पार्श्वभूमीवर, संपूर्ण मुंबईसाठी गावठाण भागांच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र आणि स्पष्ट धोरणात्मक चौकट आखणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी केली... यामध्ये गावठाण भागांसाठी Extra FSI, नियोजनातील विशेष सवलती, तसेच त्यांच्या वास्तव परिस्थितीला अनुसरून स्वतंत्र कायदेशीर तरतुदी लागू करण्यात याव्यात, जेणेकरून पुनर्विकासाची प्रक्रिया सुलभ आणि व्यवहार्य होऊ शकेल...

अंधेरी पूर्व मतदारसंघातील मरोळ, कोंदिविटा आणि गुंदवली या गावठाण भागांचा विशेष उल्लेख करत, तेथील नागरिकांना भेडसावणाऱ्या पायाभूत सुविधा, अरुंद रस्ते, जुनी वस्ती, अपुऱ्या सोयी-सुविधा आणि पुनर्विकासातील कायदेशीर अडथळे या अडचणी स्पष्टपणे मांडल्या... या भागांचा नियोजनबद्ध आणि संवेदनशील पद्धतीने विकास झाला, तर नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासोबतच शहराच्या समतोल विकासालाही चालना मिळेल...

गावठाण पुनर्विकास इमारती उभारण्याचा विषय असून, मूळ रहिवाशांचे हक्क, सामाजिक ओळख आणि जीवनपद्धती जपून आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया देखील आहे... त्यामुळे शासनाने या विषयाकडे व्यापक दृष्टीकोनातून पाहून, मुंबईतील सर्व गावठाण भागांसाठी एकसंध, दूरदृष्टीपूर्ण आणि अंमलबजावणीयोग्य धोरण जाहीर करावे, अशी योग्य भूमिका मांडली...

Post a Comment

Previous Post Next Post