रायगड :- (नरेश पाटील) : नाताळ सणाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, ख्रिस्ती समाजामध्ये उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे... २५ डिसेंबर २०२५ रोजी साजरा होणाऱ्या नाताळ उत्सवाच्या स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे... डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच चर्च, घरे आणि क्रिस्ती वसाहतींमध्ये भक्तीमय व आनंदी वातावरण निर्माण झाले असून, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाच्या प्रतीक्षेत समाज सज्ज झाला आहे...
कॅथोलिक धर्मीयांसाठी डिसेंबर महिना म्हणजे अॅडव्हेंट काळ, जो डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारपासून सुरू होतो... हा काळ आत्मपरीक्षण, प्रार्थना व आध्यात्मिक तयारीचा मानला जातो... या कालावधीत चर्चमध्ये विशेष प्रार्थना सेवा, कुटुंबीय प्रार्थना व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते... अॅडव्हेंटच्या प्रत्येक रविवारी श्रद्धा, संयम व आशेचे महत्त्व अधोरेखित करण्यात येत असून, ख्रिस्तजन्माच्या आनंदासाठी मन व आत्मा तयार केला जातो...
दरम्यान, अॅडव्हेंटच्या दुसऱ्या रविवारनंतर प्रार्थना सेवांनंतर कॅरोल गायनाच्या नियोजनाला सुरुवात होते... ख्रिस्ती कुटुंबांच्या घराघरांत जाऊन कॅरोल गायन करण्याचे नियोजन केले जात असून, त्याचबरोबर २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या मध्यरात्रीच्या मिसेसाठी (Midnight Mass) ख्रिसमस गीतांचा सरावही जोरात सुरू आहे... रायगड जिल्ह्यातील प्रमुख पॅरिश चर्च, उपकेंद्रे व चॅपल्स यांच्या परिसरात नाताळच्या सजावटीला वेग आला असून, आकर्षक गोठे (क्रिब), नाताळ वृक्ष, तारे व विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघत आहे... दरम्यान ख्रिस्ती कुटुंबांमध्येही नाताळच्या तयारीची लगबग दिसून येत आहे... घरांची स्वच्छता, रंगकाम व सजावट, पारंपरिक गोड पदार्थांची तयारी तसेच नाताळसंबंधित वस्तूंची खरेदी केली जात आहे...
यादरम्यान नाथाळ सणाकरीता ख्रिसमस गोठ्याचा (क्रिब) बाल प्रभू येसू ख्रिस्त देखावा हा माणगाव, रायगड येथील माणगाव शहरातील बामणोली रोडवरील सेंट आर्नोल्ड्स चर्चच्या परिसरातील (सर्व विकास दीप, संस्था) येथे तयारी सुरु असल्याचे देखणी छाया समोर आली आहे... या भव्य नाताळ गोठ्याच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून, सध्या त्याला शेवटची झळाळी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे... हा देखणा व आकर्षक गोठा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे नाथाळ सणाचे दिवसपासुन मोठया संख्येने भेट देत असतात...
