महाराष्ट्र वेदभुमी

दबक्या पावलांनी येऊन महिलेचा खेळ संपविला

नरभक्षी वाघाची महिला शिकार

वन्यप्राण्यांची दहशत कायम! महिन्याभरात ३ बळी 

प्रतिनिधी सचिन चौरसिया 

रामटेक:- कल्पालगतही आता मानव-वन्यजीव संघर्ष सुरूच आहे... तालुक्याच्या या विशेषता देवलापार या आदिवासीबहुल भागात बिबट्या तसेच वाघांचे हल्ले थांबण्याचे चिन्हे सध्या तरी दिसून येत नाही आहे... शेतात काम करीत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला... ही घटना देवलापार आदिवासीबहुल भागातील पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्रातील सावरा शेतशिवारात शुक्रवार (दि.२०) ला दुपारी १.३० च्या सुमारास घडली... मुक्ताबाई जुगळ्या मरसकोल्हे (वय ३२ रा. सावरा) असे मृत महिलेचे नाव आहे... तर पती जुगळ्या हा किरकोळ जखमी झाला... मुक्ताबाईच्या दुर्दैवी मृत्युमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे... मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताबाई व जुगळ्या पती-पत्नी  नेहमीप्रमाणे  शेतात वालाच्या शेंगा तोडण्याचे काम करीत होते... याचवेळी झुडपामध्ये दबा धरून असलेल्या वाघाने मुक्ताबाईवर झडप घातली... वाघ तिला फरकटत नेताना जुगळ्याने तिला सोडवण्याच्या प्रयत्न केला परंतु वाघाच्या ताकतीपुढे फारसे यश न आल्याने त्यांनी आरडाओरड केली... शेजारच्या शेतातील शेतकरी व मजूर मदतीला धावून आल्याने वाघाने तिला सोडले व जंगलात निघून गेला... गळा, मान, चेहरा व शरीराच्या अन्य भागावर गंभीर जखमा झाल्या... अचानक झालेल्या या हल्ल्यात मुक्ताबाई यांचा जागीच मृत्यू झाला... घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतातील शेतकरी, मजूर, गावकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली... मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता...

 दरम्यान पेंचच्या उपवनसंरक्षक पूजा लिंबगावकर, क्षेत्र संचालक अक्षय गजभिये, पोलीस अधिकारी, प्रादेशिकचे वनविभागाचे अधिकारी सागर बन्सोड, जयेश तायडे व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले... पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला... उल्लेखनीय म्हणजे, परिसरात वाघाचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून, तत्काळ  वाघाला जेरबंद करण्याची मागणी होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post