नगरधन-दुधाळा रीठी शिवारात भीतीचे वातावरण.
नगरधन शेतशीवार परिसरात वाघाचा प्रत्यक्ष वावर
प्रतिनिधी सचिन चौरसिया
नगरधन :- रामटेक तालुक्यातील नगरधन आणि परिसरातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत गंभीर आणि तातडीची बाब समोर आली असून गेल्या दोन दिवसांत वाघाच्या सलग हालचालींमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिनांक २५ डिसेंबर रोजी पहाटे बनपुरी येथील शेतकरी धनराज मेंघरे यांच्या गायीची वाघाने शिकार केली. या घटनेनंतर त्याच दिवशी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास रामटेक-मौदा रोडवरील मोठ्या कालव्याजवळ वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याची घटना घडली. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या महिलांनी तात्काळ काम थांबवून घरी धाव घेतली. या घटनांची दहशत असतानाच २६ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे आठ वाजता मौजा नगरधन येथील दुधाळा रीठी शिवारात शेतकरी मंगेश ईखार यांच्या शेतात वाघ प्रत्यक्ष दिसून आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाघाचा सततचा वावर लक्षात घेता परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत सदस्य सचिन दशहरे यांनी या घटनेची तात्काळ माहिती रामटेक वनविभागाला दिली. वनविभागाने गंभीर्याची दखल घेत वनरक्षक डी.आर. लोणारे यांनी त्यांचा सहकार्यासह संपूर्ण परिसरात वाघ शोधण्यासाठी गस्त घातली. या पार्श्वभूमीवर सरपंच माया अरुण दमाहे यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत...
शेतशिवारत काम करताना अत्यंत दक्षता बाळगावी. अत्यावश्यक असल्यावरच शेतात जावे व एकटे न जाता ४ ते ५ जणांच्या गटाने जावे. शेतात जाताना काठी सोबत ठेवावी तसेच वेळोवेळी आवाज करत रहावे. जेणेकरून हिंस्त्र प्राणी जवळ येणार नाही. वाघ दिसून आल्यास तात्काळ वनविभाग व ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.“नागरिकांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे. सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी,” असे आवाहन सरपंच माया अरुण दमाहे सह सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
