महाराष्ट्र वेदभुमी

खांदाडमध्ये मध्यरात्री थरार, विजेची जिवंत तार रस्त्यावर कोसळली; कुत्र्याला जबर झटका, मोठा अपघात टळला

माणगाव :- (नरेश पाटील):शहरातील खांदाड गावात काल उशिरा रात्री साडेदहाच्या सुमारास एक भयंकर प्रकार घडला. वीज खांबावरील जिवंत विद्युत तार अचानक तुटून मुख्य रस्त्यावर कोसळली आणि काही क्षणांतच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले...

तार दोन भागांत तुटली — एक टोक थेट रस्त्यावर पडले तर दुसरे टोक काही मीटर अंतरावर नाल्यात जाऊन पडले. त्याच क्षणी नाल्यातील पाणी उकळू लागले आणि पांढऱ्या धुराचे ढग वर चढताना दिसू लागले...

दरम्यान काही तरुणांनी वेळेवर ही घटना पाहून घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी एक भटकं कुत्रं त्या तारेला स्पर्शून बसले आणि क्षणात मोठा ठिणगीचा आवाज व विजेचा झटका बसला. कुत्र्याने किंकाळी फोडत पळ काढला; त्याच्या अंगावर भाजल्याच्या खुणा दिसत होत्या. ही भीषण घटना पाहून रहिवासी घराबाहेर पडले आणि रस्त्यावर एकाच गोंधळ उडाला...

जणू विजेचा कडकडाट रस्त्यावरच झाला,” असे एका रहिवाशाने सांगितले. “कुत्र्याच्या किंकाळ्या आणि अचानक झालेली निळी ठिणगी पाहून अंगावर काटा आला.”

या सतर्क तरुणांनी तत्काळ पुढाकार घेत जाणारे वाहनचालक व पादचारी यांना थांबवून सतर्क केले, त्यामुळे कोणताही जीवितहानीचा मोठा अपघात टळला...घटनास्थळावरील साक्षीदारांनी सांगितले की, या प्रसंगाच्या काही मिनिटे आधीच दोन महिला त्याच मार्गाने गेल्या होत्या... त्यांनी काही अंतर पार करताच अचानक ठिणगीचा आवाज झाला आणि त्या भीतीने आरडाओरडा करत मागे वळल्या...

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका तरुणाने झाडाजवळ ठिणगी दिसल्याचे लक्षात येताच लगेचच एका पिकअप वाहनाला थांबवले आणि तत्काळ महावितरण कार्यालयाला फोन करून माहिती दिली... काही मिनिटांतच महावितरणचा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्याने मुख्य वीजपुरवठा बंद करून रस्त्यावरील दिवे बंद केले व मग आपल्या इतर सहकाऱ्यांना बोलावले...

पत्रकाराने विचारले असता, ही तार एवढी मोठी ठिणगी देत का तुटली, यावर त्या कर्मचाऱ्याने सांगितले,लोड वाढल्यामुळे किंवा अचानक वीजेचा दाब वाढल्याने असे होऊ शकते. ताराही जुन्या झाल्यामुळे कधी कधी अशा घटना घडतात,” असे त्यांनी सांगितले...

या घटनेनंतर आणखी एक बाब पुढे आली की, खांदाड परिसरातील वीज वाहक तारा अतिशय जुन्या आणि कमजोर झाल्या आहेत, त्यामुळे ठिणगी लागल्यास त्या सहज तुटतात... आता तातडीने नवीन आणि मजबूत तारा बसवायला हव्यात, अन्यथा मोठा अपघात घडू शकतो,” असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका शिक्षित तरुणाने सांगितले...

विशेष म्हणजे या घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच खांदाड परिसरात तब्बल एक तास वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर सुमारे अर्ध्या तासात ही घटना घडली, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली...

 दरम्यान या भागातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला असून, महावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करत होते...

आमच्या प्रतिनिधीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रस्त्यावर पडलेला जळालेला तार, वितळलेले प्लास्टिक आणि काळवंडलेल्या खुणा दिसत होत्या — ज्या काल रात्रीच्या त्या थरारक घटनेची साक्ष देत होत्या. या दरम्यान रात्री ठीक 12:07 मिनिट वा. एमएसईबी कर्मचारी यांनी सर्व गोष्टी सुरळीत करुन लाईट चालू केली. दरम्यान सदर घटना राजीपा शाळा जवळील मोर्बा रोड कडे जाणारा रस्त्याचा काही अंतरावर ही घटना घडली तसेच येथीलचे अनेक विद्युत वाहिनी हे मधी मधी जॉईंट करुन बांधल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे...  विद्युत खांब वरुन तार तुटून पडत असल्याचे आपण पाहिले किंबहुना ऐकले मात्र विधुत वाहिनीची तार चक्क मधूनच भागातून तुटून पडण्याचा हा प्रकार म्हणजे मोठी चिंतेची बाब हा समोर आली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post