महाराष्ट्र वेदभुमी

श्रीधावीर महाराज पालखी सोहळयाची दुसऱ्या दिवशी सांगता!

30 तासांनंतर देव मंदिरात परतला ; सेवेकरी तरुणांचे अखंडित आणि अविश्रांत परिश्रम!

कोलाड (श्याम लोखंडे) : रोहयाचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांची शुक्रवारी पहाटे सुरू झालेल्या पालखी सोहळयाची सांगता दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपार नंतर झाली. शहरात फिरून रोहेकरांना दर्शन देत आणि गावामध्ये बंधुभेटी करीत 30 तासांनंतर देव मंदिरात परतले, यावेळी रोहा पोलिस निरीक्षक मारुती पाटील व पथकाने महाराजांना पुन्हा सशस्त्र मानवंदना दिली. महाआरती आणि सेवेकऱ्यांचे मानपान कार्यक्रमानंतर पालखी उत्सवाची सांगता  झाली, उत्सवात सेवेकरी तरुणांनी अथक, अखंडित आणि अविश्रांत परिश्रम घेतले...

एका कुटुंबातील सोहळ्या प्रमाणे अवघ्या गावाचा एक आगळा वेगळा उत्सव असलेल्या या उत्सवात पालखी बरोबर हजारो भक्तगणांनी रात्र जागून काढली, समेळ वाद्य, हळगी, खालुबाजे, झांज पथके, ताशे, अलिबाग आणि रोहा येथील नगारे पथकांनी या उत्सवाची शोभा वाढविली, हजारो भक्तांच्या सोबतीने महाराजांच्या पालखीने रोहा नगरीची प्रदक्षिणा पूर्ण केली. यावेळी परंपरे नुसार मंदिर ट्रस्ट आणि उत्सव समितीकडून रायगड पोलीस, महसूल विभाग, रोहा नगर पालिका, महावितरण विभाग, उत्सवाचे मानकरी आदींसह तीसतीस तास पालखीउत्सवात अखंडपणे विविध प्रकारे सेवा देणाऱ्या सेवेकऱ्यांना प्रसादाचे नारळ भेट देत त्यांचे सन्मान करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक मारुती पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष कुमार पाशिलकर, सरचिटणीस दर्शन कदम, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, विश्वस्त नितिन परब, महेश सरदार, प्रकाश पवार, लालताप्रसाद कुशवाह, संदीप सरफळे, मयुर पायगुडे आदी ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. जवळपास 32 तास चाललेल्या या पालखी सोहळ्यासाठी ट्रस्टचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह उत्सव समितीचे अध्यक्ष कुमार पाशिलकर, कार्यवाह दर्शन कदम, उपाध्यक्ष सागर कोलटकर, सचिन पाशिलकर,सहकार्यवाह नागेश पाटणकर, ओंकार गुरव, खजिनदार सूरज राऊत, सहखजिनदार ओमकार काफरे आदींसह सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी या पालखी सोहळ्यात अविश्रांत परिश्रम घेतले...

-तरुणांची अनवाणी पायाने 30 तास पालखी सेवा-

या पालखी सोहळ्यात उत्सव समितीतील काही पदाधिकारी, गावातील तरुण सेवेकरी आणि धावीर भक्तांनी 31 तास पालखी समवेत अनवाणी पायाने आपली सेवा रुजू केली, पालखीसाठी विविध सेवा देणाऱ्या काहींसह मोठ्या संख्येने तरुण यामध्ये सहभागी झाले होते. दोन दिवस कडक उन्हात कशाचीही तमा न करता ही मंडळी पालखी समवेत सेवा देत होती, काहींच्या पायांना छोट्यामोठ्या जखमाही झाल्या, परंतु या तरुणांनी धावीर महाराजांचा जयघोष करीत पालखी दरम्यान आपली अखंडित आणि अविश्रांत सेवा रुजू केली.

Post a Comment

Previous Post Next Post