महाराष्ट्र वेदभुमी

शेतकऱ्यांचा खरा संरक्षक : किशन जावळे

 

माणगाव :- (नरेश पाटील)  रायगड जिल्ह्यातील शेतकरी व आदिवासींसाठी उशीरा रात्री जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दाखविलेला जिव्हाळा हा जिल्ह्याच्या इतिहासातील अभूतपूर्व क्षण ठरला. अखेरच्या क्षणी अलीबागवरून ११० किलोमीटरचा प्रवास करून, शुक्रवारी दि. २६ सप्टेंबर रोजी रात्री जवळपास १० वाजता ते माणगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहिले... एस.बी.आय. बँकेच्या सीएसआर निधीतून आयोजित आणि लक्ष्मण जाधव (एमआयडीसी नियोजन सदस्य) यांच्या प्रयत्नातून तसेच स्वराज्य व सर्व विकास दीप संस्थांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते...
या कार्यक्रमात शेतकऱ्यांना वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले... उशीरा असूनही मोठ्या संख्येने शेतकरी, विशेषतः आदिवासी व अल्पभूधारक शेतकरी, हजेरी लावून जिल्हाधिकाऱ्यांवरील विश्वास प्रकट केला...

आपल्या मनोगतात जिल्हाधिकारी जावळे यांनी विशेषत: महिलांच्या कष्टांचे कौतुक केले... “घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करून त्या शेतात राबतात, ही त्यांची खरी ताकद आहे,” असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी कर्जत तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. गावभेटीदरम्यान शेतकऱ्यांनी त्यांना आपली शेतीमाल विक्रीसाठी योग्य मंच उपलब्ध नसल्याचे सांगितले होते... त्यावर तात्काळ प्रतिसाद देत त्यांनी एसटी बस वाहतुकीची व्यवस्था केली. “२५ सप्टेंबर २०२५ रोजी तीन फेऱ्या पार पडल्या असून आदिवासी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा झाला आहे,” असे त्यांनी सांगितल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला...

माणगावातील आदिवासी शेतकऱ्यांच्या विक्री हक्काबाबतही त्यांनी ठाम भूमिका घेतली. नगरपरिषदेने आदिवासींना हटवून बाहेरील फेरीवाल्यांना प्रोत्साहन दिल्याची कारवाई त्यांनी कडक शब्दांत धिक्कारली. “मी आदिवासींच्या पाठीशी उभा आहे आणि त्यांना पूर्ण संरक्षण देईन,” असा ठाम संदेश त्यांनी दिला...

आपल्या भाषणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्या हस्ते शेतकऱ्यांना वृक्षरोपांचे वाटप करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यानंतर माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी त्यांचा हा उशीरा रात्रीचा प्रवास ऐतिहासिक ठरल्याचे म्हटले... त्यावर त्यांनी नम्रतेने उत्तर दिले – “यात काही विशेष नाही, हे आमच्या कामाचा एक भाग आहे... आम्ही अनेकदा रात्री-दिवस काम केले आहे... आजचा उशीर हा वरिष्ट अधिकाऱ्यांच्या अचानक बैठकीमुळे झाला. तरीही वचन दिले होते म्हणून आलो...”

जिल्ह्यातील नागरिक व शेतकरी मात्र या घटनेला ‘प्रशासनातील सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण’ मानत आहेत... रायगडच्या इतिहासात प्रथमच एका जिल्हाधिकाऱ्याने उशीरा रात्री शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना दिलासा दिला आहे. खऱ्या अर्थाने ते “शेतकऱ्यांचे संरक्षक” ठरले आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post