महाराष्ट्र वेदभुमी

शासन झोपले आहे, पण खड्डे जागे आहेत!

 

तात्काळ दुरुस्तीची मागणी; माणगावच्या नागरिकांचा संतप्त सवाल – आणखी किती वेळ ‘दुर्दैव’ वाट पाहायचं?

माणगाव :- (नरेश पाटील)

माणगाव शहरातील एक आंतरिक रस्ता आज अक्षरश भयावहा कुशीत घसरू पाहतोय. या रस्त्यावरून दररोज शेकडो पादचारी, विद्यार्थी, दुचाकीस्वार, शासकीय कर्मचारी यांची वर्दळ असूनही प्रशासन अजूनही दुर्लक्ष करत आहे... या मार्गाची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, नागरिकांचे प्रत्येक पाऊल आता जोखीम बनले आहे. नगर पंचायतच्या काही हाकेचा अंतरावर येणारा हा रस्ता, वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रांत कार्यालय, तहसील कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आणि स्थानिक शाळकरी विद्यार्थ्यांचा प्रमुख मार्ग आहे. तरीही रस्त्यावरील उघडे खड्डे, चिखल, साचलेले पाणी, बंद पथदिवे यामुळे पादचाऱ्यांना प्रत्यक्ष जीव मुठीत धरावा लागत आहे...  "हा रस्ता पूर्वी बंद होता. पण मुख्य कचेरी रोड मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार खुला करण्यात आला. मात्र आता तो ‘खुला धोका’ ठरतोय," अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली...  या रस्त्यावरून शाळेत जाणाऱ्या मुलांची सुरक्षितता गंभीर धोक्यात आहे... सकाळी, दुपारी व संध्याकाळी होणारी मुलांची वर्दळ अपघातांना आमंत्रण देत आहे. नागरिक व पालक यांचे मन अस्वस्थ आहे. वृद्ध व्यक्ती, महिला आणि विद्यार्थ्यांच्या तोंडचे शब्द थांबत नाहीत – "एखादा जीव गमावल्यावरच का हालचाल होणार?" यावर कोणतीही यंत्रणा जबाबदारी स्वीकारायला तयार नाही... कुणाच्या अखत्यारीत आहे, याचं राजकारण नको – "कोणत्याही विभागाने पुढाकार घ्या, खड्डे बुजवा, नाली बांधा, पाणी जाण्याची सोय करा आणि पथदिवे कार्यरत करा!" हीच नागरिकांची ठाम मागणी आहे... प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना भयमुक्त वाटचाल देणं ही काळाची गरज आहे. अन्यथा उद्याचा अपघात आणि त्यातून उगवणारे प्रश्न ‘दुर्दैव’ म्हणून फेटाळले जातील – आणि पुन्हा एकदा यंत्रणा झोपलेलीच असेल, पण खड्डे मात्र जागेच राहतील...

Post a Comment

Previous Post Next Post