महाराष्ट्र वेदभुमी

बायपास कामाला लागणार आणखी दोन वर्षे; खा.सुनील तटकरे यांची माहिती

माणगाव :- (नरेश पाटील)  माणगाव आणि इंदापूर येथील बायपास रस्त्याच्या कामाला सुरूवात होण्यासाठी किमान दीड ते दोन वर्षे लागणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली असून, या घोषणेमुळे माणगावकरांमध्ये आश्चर्य व गंभीर चिंता व्यक्त होत आहे... ही माहिती शनिवारी सायंकाळी माणगाव येथे रु. २.५ कोटींच्या सौर पथे दिवे आणि हायमास्ट लॅम्प प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना त्यांनी दिली... खा. तटकरे यांनी माणगाव शहरातील वाढती लोकसंख्या, पर्यटकांची वाढती वर्दळ आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील स्थिती यामुळे गंभीर वाहतूक कोंडीचे संकट निर्माण झाले आहे... असे स्पष्टपणे मान्य केले... “होय, हे पूर्णपणे खरं आहे... वाहतूक ही माणगावकरांसाठी मोठ्या डोकेदुखीचा विषय बनला आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले... सन्माननीय तटकरे यांनी असेही नमूद केले की, माणगावपासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या इंदापूर येथील परिस्थिती देखील तितकीच बिकट असून, तेथील वाहतूक समस्या अजूनही प्रलंबित आहेत...राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर असलेल्या या दोन्ही ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक जाम होत आहे... याच अनुषंगाने बोलताना तटकरे यांनी सांगितले की, ज्येष्ठ नेते राजीव साबळे यांनी १० जुलै रोजी बायपास कामावरील ढिसाळपणाविरोधात मोठा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता... “मी स्वतः त्यांना भेटलो, सविस्तर चर्चा केली आणि त्यांना विनंती केली... त्यानंतर त्यांनी ती आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला, कारण मी त्यांना आश्वासन दिलं की उपमुख्यमंत्री अजित पवार २ ऑगस्ट २०२५ रोजी माणगाव दौर्‍यावर येणार आहेत,” असे तटकरे यांनी सांगितले... त्यांनी स्पष्ट केले की ही भेट त्यांच्या पक्षाच्या विस्तार कार्यक्रमाच्या अनुषंगाने आहे, मात्र त्यावेळी महामार्ग आणि वाहतूक संदर्भातील समस्या देखील त्यांच्यासमोर मांडल्या जातील...

पुढील योजनांबाबत सांगताना तटकरे म्हणाले की, माणगाव शहरातील अंतर्गत रस्त्यांचे पुनरविकसन तसेच बामणोली रस्ता मार्गे मोर्बा रस्त्याशी जोडणारा नवीन रस्ता विकसित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे... या मार्गामुळे मुख्य राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील ताण कमी होईल आणि भविष्यातील नागरी विकासास चालना मिळेल... दरम्यान, गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे... कोकणातील विविध ठिकाणी जाण्यासाठी लाखो भाविक राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मार्गे प्रवास करतात, त्यात माणगाव हे मुख्य टप्प्यावर आहे... त्यामुळे हजारो वाहनांची एकाच वेळी होणारी वाहतूक ही गेल्या दोन दशकांपासून मोठी समस्या ठरली आहे... अशा वेळी, बायपास कामाला लागणारी आणखी दोन वर्षांची प्रतीक्षा ही माणगावकरांसाठी अधिक चिंतेची बाब ठरत आहे, आणि त्यामुळे आता या समस्येकडे गंभीरपणे आणि तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post