रानभाज्या महोत्सवातून विविध रानभाज्यांची ओळख
प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक :- सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या पावसाळ्यात आढळून येतात... या रानभाज्या म्हणजे आदिवासी मंडळींसाठी जगण्याचा मोठा आधार... जंगलांवर उपजीविका करणाऱ्या आदिवासींना या पावसाळी भाज्यांची चांगली ओळख असते... त्यावर त्यांची घरे चालतात... या भाज्यांना हल्ली चांगली मागणी येऊ लागल्याने काही आदिवासी मंडळी त्या विक्रीसाठी बाजारात आणू लागली आहेत... मुळात या भाज्यांची खास लागवड केली जात नाही... निसर्गक्रमानुसार जंगलांमध्ये त्या उगवतात... यापैकी कुठल्या भाज्या खाव्यात हे आदिवासी लोकांना माहीत असते... अगदी सहज ओळखण्याजोग्या रानभाज्या आपणास वर्षाऋतूमध्ये आजूबाजूला आढळून येतात... यामध्ये सर्वात जास्त आढळणारी भाजी म्हणजे टाकळा, याची भाजी पौष्टिक मानली जाते... रस्त्याच्या आजूबाजूला जेथे नजर फिरेल तेथे आपणास हिरव्यागार पानांचा टाकळा वाढलेला आढळून येतो...
स्थानिक रहिवाशांच्या नजरेस त्या पडल्या की, त्यांच्या आहारात ह्या भाज्यांचे प्रमाण वाढते. रानभाज्यांच्या कंद, फळे, पाला, देठ, फुले अशा विविध भागांचा वापर केला जातो... काही रानभाज्यांची चव काहीशी तुरट, काहीशी कडवटही असते... स्थानिकांच्या मते विविध औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या आरोग्याला पोषक असतात... पावसाळ्यातल्या रानभाज्या हे काही गावकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन असते... रानात, डोंगरात भटकून भाजी आणण्याच्या कामी लहान मुलांचाही खूप उत्साह असतो... मुलं शाळा सुटल्यावर डोंगरात जाऊन भाज्या गोळा करण्यात गुंतून जातात. ग्रामीण भागातील विशेषतः आदिवासी भागातील ह्या रानभाज्यांची चव चाखायची संधी हल्ली काही शहरी रहिवाशांनाही मिळते आहे... तुम्ही 'रानभाज्या महोत्सव' हा शब्द ऐकला असेल... अशा महोत्सवातून विविध रानभाज्यांची ओळख होते... विविध चवींच्या भाज्या खाण्याचा विशेष अनुभव मिळतो... खतांचा, रसायनांचा वापर नसलेल्या रानभाज्या हा निसर्गान दिलेला अनमोल नजराणा आहे...
टाकळ्याची (तरोटा) भाजी बहुगुणी
वेगवेगळे गुणधर्म सर्व रानभाज्या पावसाळ्यात आढळून येतात... सर्व रानभाज्यांचे आरोग्यदायी गुण आहेत... प्रत्येक भाजीचे गुणधर्मसुद्धा वेगवेगळे आहेत... मधुमेहासह चरबीचे विकार, वजन वाढणे, पोटाचे आजार, बद्धकोष्ठता याच्यासाठी टाकळ्याची भाजी बहुगुणी मानली जाते...
