महाराष्ट्र वेदभुमी

नगरधन येथील किराणा दुकानात धाड ; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई


२ लाख ३० हजरांचा सुंगधित तंबाखू व गुटखा जप्त

प्रतिनिधी : सचिन चौरसिया

रामटेक :- अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नगरधन येथील दोन किराणा दुकानात धाड टाकत २ लाख ३० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केला... ही कारवाई सोमवारी (दि.१४) सायंकाळी ८.०० वाजता करण्यात आली...

शंकर रामजी नासरे (५५) व अक्षय नासरे (३४) रा. नगरधन यांचे नासरे किराणा व जनरल स्टाेर्स नामक दुकान आणि अभिलाष राधेश्याम वाघमारे (३४) रा. नगरधन यांचे अभिलाष किराणा व जनरल स्टोर्स दोन्ही दुकानातून प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली हाेती... त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ८.०० वाजताच्या सुमारास धाड टाकून दोन्ही दुकानाची झडती घेतली... यात त्यांना सुगंधित तंबाखु व पाकिटे तसेच पानमसाला नामक गुटख्याची पाकिटे आढळली. राज्य शासनाने या गुटखा व सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर बंदी घातली असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केला. याची एकूण किंमत २ लाख ३० हजार रुपये असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयाम, नागपूर यांनी सांगितले... याप्रकरणी रामटेक पोलिसांनी नासरे किराणा स्टोअर्सचे मालक शंकर रामाजी नासरे (५५) व अक्षय शंकर नासरे (३४) तसेच अभिलाष किराणा स्टोअर्सचे मालक अभिलाष राधेश्याम वाघमारे (३४), तिघेही रा. नगरधन, ता. रामटेक यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२३, २७४, २७५,२२३, शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे कलम २२१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे... विशेष म्हणजे, महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू आणि गुटख्याच्या विक्रीवर बंदी घातली असली तरी रामटेक तालुक्यात हा तंबाखू व गुटखा शेजारच्या राज्यातून विक्रीसाठी आणला जातो... या दोन्ही दुकानांमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा आढळून आल्याने कर्मचाऱ्यांनी ते जप्त केले आणि संबंधित दुकानदारांवर कारवाई केली... ही कारवाई जिल्हा अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयाम यांच्या नेतृत्वातील पथकाने केली...

Post a Comment

Previous Post Next Post