नागपूरात उपचार सुरु, गावात भीतीचे वातावरण
प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक:- वनपरीक्षेत्र हद्दीत येणाऱ्या बोरडा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सत्रापूर गावात दीड महिन्यापासून हिंसक प्राण्याची धुमाकूळ असून सत्रापूर शिवारात असलेल्या अस्मिता ऑरगॅनिक फार्मवर कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकावर भरदिवसा बिबट्याने हल्ला केल्याची घटना रविवार (दि.२८) जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली...
सुरक्षारक्षक रामचंद्र शेंदरे (३५ वर्ष) रा. सरखा, बोरडा हे गंभीर जखमी झाले असून सत्रापूर गावाजवळील शिवारात असणाऱ्या अस्मिता ऑरगॅनिक फार्मवर रामचंद्र प्रेमदास शेंदरे सुरक्षारक्षक म्हणून आपल्या कर्तव्यावर असताना फार्म जवळील परिसरातील पाण्याच्या पाईप मध्ये दडून बसलेल्या बिबट्याने भीषण हल्ला केला यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी उपस्थित कामगारांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या तेथून पसार झाला... तात्काळ जखमीला रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकल कॉलेज येथे पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती रामटेकचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांना देण्यात आली असून त्यांनी तात्काळ मनसरचे क्षेत्र सहाय्यक मुनेश्वर गोंडीमेश्राम यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा तयार करण्यास सांगितले...या संपूर्ण घटनेने बोरडा, सराखा व सत्रापूर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जखमीला वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे...
