महाराष्ट्र वेदभुमी

चौल-आग्राव रस्ता रखडला, सहा महिने उलटूनही काम सुरू नाही...


जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रेंकडून फटकार... !!! 

खासदार तटकरे यांचा अभियंतांना थेट आदेश...!!!

अलिबाग (ओमकार नागावकर): चौल-आग्राव रस्त्याचे काम मंजूर होऊन सहा महिने उलटून गेले, तरी काम सुरू झालेले नाही, ही बाब अत्यंत धक्कादायक असून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस समजावा लागेल... मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेला, सुमारे ३ किलोमीटर लांबीचा हा रस्ता ६ डिसेंबर २०२४ रोजी मे सुधाकरा इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद या कंपनीला देण्यात आला... कामाचा कार्यारंभ आदेश दिला असतानाही, अद्याप एकही खोदकामही झालेले नाही...



सदर परिस्थितीचा निषेध करत दि. २६ जून रोजी समस्त चौल ग्रामस्थ व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले... यावेळी जिल्हा नियोजन बैठकीसाठी आलेले खासदार सुनील तटकरे यांनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले... त्यांनी तत्काळ कार्यकारी अभियंत्यांना रस्ता सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले...

या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे ८ ते १० हजार नागरिकांना दररोज खड्यांतून प्रवास करावा लागत आहे... रिक्षाचालक सुद्धा त्या भागात जाण्यास नकार देत आहेत... शितळादेवीसारख्या प्रसिद्ध मंदिरात येणारे भाविक व पर्यटक यामुळे हताश झाले आहेत... त्यामुळे स्थानिकांचा रोजगारही धोक्यात आलाय...

०८ एप्रिल २०२५ रोजी अभियंता व ठेकेदारांनी पाहणी करून काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते केवळ गाजर दाखवण्यापुरतेच ठरले... रस्त्याचे कोणतेही काम आजतागायत सुरू झालेले नाही...

ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, जर पावसाळ्यापूर्वी सर्व खड्डे बुजवून रस्ता पूर्ववत केला नाही, तर उग्र आंदोलन किंवा चौल बंद करण्यात येईल आणि त्यास कारणीभूत असलेल्यांचीच पूर्ण जबाबदारी राहील...

Post a Comment

Previous Post Next Post