महाराष्ट्र वेदभुमी

जनावरांवर उपचार करावे तरी कसे? पशु वैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर

पशु वैद्यकीय दवाखान्याचे झाले वस्तुसंग्रहालय

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- तालुक्यातील नगरधन येथील पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ हा गुरांचा दवाखान्याचे वस्तुसंग्रहालय झाले आहे... कारण मागील कित्येक वर्षापासुन येथे डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने परिसरातील अनेक जनावरे उपचारांअभावी मरण पावत असल्याची खंत पशुपालकांनी व्यक्त केली आहे... पशु वैद्यकीय दवाखान्यात सध्या एकही अधिकारी व कर्मचारी कार्यरत नसल्याने परिसरातील दहा गावांमधील पाळीव जनावरांच्या निरोगी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेळी, बैल, गाय, म्हैस आदी पाळीव जनावरांवर विविध आजार येत असून गावातील दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने पशु व शेळी पालकांच्या अडचणीत भर पडली आहे... नगरधनसह परिसरातील शेतकऱ्यांच्या गुरांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने हा दवाखानाच आजारी झाला आहे... पशुसंवर्धन खात्याच्या या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून पशुधन बाळगणाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे...

नगरधन व परिसरातील गावांमध्ये दुग्धव्यवसाय करणाऱ्यांची व दुधाळ तसेच इतर जनावरांची संख्या मोठी आहे... या सर्व गुरांवर उपचार करण्याची सोय नगरधन व रामटेक येथे आहे... नगरधन येथे फार पूर्वी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ निर्माण करण्यात आला... येथील दवाखान्याचा सर्व कारभार छोट्या इमारतीतून चालत असून, ती इमारत जुनी झाली आहे... या दवाखान्यात पशुचिकित्सकासह इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती असली तरी मागील काही वर्षांपासून येथील पशुचिकित्सकाचे पद रिक्त आहे... पशुचिकित्सकाअभावी गुरांना वेळीच योग्य उपचार मिळत नाही... अशा परिस्थिती शेतकऱ्यांना त्यांची जनावरे रामटेक अथवा अन्य ठिकाणच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा खासगी पशुचिकित्सकांकडे न्यावी लागतात... आजारी जनावरे उपचारासाठी बाहेरगावी नेणे हे जिकरीचे काम असल्याचे अनेक पशुपालकांनी सांगितले... खासगी पशुचिकित्सक उपचारासाठी वाजवीपेक्षा अधिक पैसे घेत असल्याने ते आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले... त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन ही समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे...

गुरांचे लसीकरण करणार कोण?

पावसाळ्यात सर्वच प्रकारच्या गुरांना साथीचे विविध आजार होतात... यात काही आजारांमध्ये गुरे दगावण्याची शक्यता अधिक असते... या आजारांपासून गुरांचा बचाव करण्यासाठी त्यांचे पावसाळ्यात लसीकरण करणे अनिवार्य असते... नगरधन येथील दवाखान्यात पशुचिकित्सक नसल्याने या परिसरातील गुरांचे लसीकरण करणार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post