महाराष्ट्र वेदभुमी

"वाहतुकीतून समाजसेवा: माणगावात तरुणांचा अनुकरणीय पुढाकार!"

माणगाव (नरेश पाटील):- मुंबई-गोवा महामार्गावरील (NH-66) बायपासचे काम अपूर्ण असल्यामुळे माणगाव शहराला प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे... उद्योगधंद्याशी संबंधित जड वाहने, लक्झरी कार, स्थानिक व दररोजचे प्रवासी, तसेच पर्यटक यांची वाढती गर्दी आणि वाहतुकीतील शिस्तभंगामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनते... विशेषतः शनिवार-रविवार तसेच सलग सुट्ट्यांमध्ये ट्रॅफिकची तीव्रता वाढते. स्थानिक पोलीस वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असले तरी, अपुऱ्या मनुष्यबळामुळे अडचणी निर्माण होतात... अशा पार्श्वभूमीवर माणगावातील काही सामाजिक जाणीव असलेले तरुण स्वतःहून पुढे येऊन ट्रॅफिक नियंत्रित करत असल्याचे दृश्य आता वारंवार दिसून येते. शेलार नाका, मोर्बा रोड, कचेरी कॉर्नर या ठिकाणी सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री देखील हे तरुण वाहतुकीस दिशा देताना दिसतात...

या उपक्रमात ऑटोचालक, हॉटेल चालक, भाजी विक्रेते असे विविध स्तरातील युवक सहभागी असून, प्रसिद्धीपासून दूर राहून केवळ सामाजिक बांधिलकीतून हे कार्य करत आहेत... ज्ञानदेव पवार यांचे मार्गदर्शन या तरुणांना लाभत असल्याचेही ते आवर्जून सांगतात... हे तरुण लेन तोडणाऱ्यांना रोखणे, ओव्हरटेक करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे, आणि अडथळा होणारी वाहने बाजूला घेणे अशा कृतींतून ट्रॅफिक व्यवस्थापन करत आहेत... प्रशासनाच्या प्रयत्नांबरोबरच या तरुणांचा सहभाग ही एक प्रेरणादायी बाब ठरत असून, समाजाच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे... यामधून संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक नवा सामाजिक नमुना उभा राहत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post