कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील कोलाड खांब देवकान्हे परिसरात सुरवातीचा कधी जोराचा पाऊस होतो आणि त्या पावसात कधी 'वल्गन चढते याकडेच वल्गन खवय्यांच्या नजरा लागलेल्या असतात परंतु खवळा लागेल गळाला' वल्गन आली रे..! रोहा परिसरात मागील दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खाडीत शिरणारे भरतीचे पाणी आणि पावसाच्या पाण्याचा जोर यामुळे खाडीतील मासळी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ओढा, नाले आणि शेतात शिरू लागली आहे... समुद्रातील मासेमारीला बंदी असल्याने या वल्गनीच्या माशांवर खवय्यांच्या उड्या पडत आहेत... यामुळे नदी किनारी,कालव्यात, तर डोंगर भागातून वाहणारे ओढे,शेतात,वल्गनदार आपले पागीर, जाळी, कंडाळ हातात काठी घेऊन मासे पकडण्यात धावपळ करत असताना दिसतात.. तर दुसरीकडे अडचणीत आलेल्या खाडी किनाऱ्यावरील छोट्या मच्छीमारांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे...
रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात तसेच विविध परिसरात मागील दोन तीन दिवसांपासून धुंवाधार सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वल्गनीत शिवडा, वाम, मळ्याचे मासे, कटला, खवला, असे मासे आढळून येतात तर त्यांची चवच लय न्यारी म्हणून सारे खवय्ये वल्गनीच्या माशाकडे टक लावून बघत असतात मात्र दिसला रे दिसला की लगेच त्याला पकडण्यासाठी मोठी धावपळ करत अखेर त्याला आपल्या जाळ्यात ओढतात...
या दिवसात मासळी अंडी सोडण्यासाठी तसेच चिंबोऱ्या पिल्ले सोडण्यासाठी ओढे, तलावांमध्ये तसेच शेतकऱ्यांच्या शेतातही सैरावैरा धावत असतात... नदीपात्रा जवळच्या शेतात आलेले मासे आणि चिंबोऱ्या पकडण्यासाठी तरुणांनी एकच गर्दी केलेली आणि जागोजागी शेतातल्या पाण्यात पाग लावलेल पाहायला गुरुवारी दिवसभर मिळत होते ...
'वल्गन म्हणजे नदीचं पाणी पाटातून ओढ्यात घेणं.' गोड्या पाण्यातील हे चविष्ट मासे फक्त याच दिवसात तसेच सुरवातीच्या पावसात मिळतात... आणि हे मासे पकडले जातात ते पूर्ण पारंपरिक पद्धतीने पागछत्री टाकून, कंडाळ जाळं टाकून आणि काठीनेसुद्धा पकडले जातात... सुरुवातीच्या पावसातच वल्गन सापडते...वल्गनीचे मासे चवदार असल्याने कोलाड तसेच रोह्याच्या बाजारात वल्गनदार विक्रीस बसतात त्याची खवय्ये मोठी किंमत मोजून त्याची चविष्ट चव घेण्यासाठी खरेदी करत असतात...
