नागरिक त्रस्त, आरोग्य धोक्यात; स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त प्रतिक्रिया–
ज्ञानदेव पोवार यांचा प्रशासनाला जाब
माणगाव प्रतिनिधी–:(नरेश पाटील): माणगाव शहरातील मोर्बा रोड परिसरात सांडपाण्याच्या प्रमुख ड्रेनेज लाईनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे परिसरात सांडपाणी ओपनली वाहत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोग्य व पर्यावरणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे... ही स्थिती गंभीर आहे, असे प्रत्यक्ष पाहणी दरम्यान माणगाव नगर पं. सदस्य तथा माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी सांगितले. "ही फक्त निष्काळजी नाही, तर ही नागरी आपत्ती आहे," असे त्यांनी ठामपणे नमूद केले... शहरातील मुख्य मार्केट व मोर्बा रोडवरील सांडपाणी दोन किलोमीटर बाहेर नेण्यासाठी मोठ्या सिमेंट पाइप्समधून वाहून नेले जाते.. परंतु, एस्सार पेट्रोल पंपाच्या समोर एका महत्त्वाच्या जोडणीवर हे पाइप तुटले असून, त्या जागेवरून मोठ्या प्रमाणात सांडपाणी बाहेर येत आहे...
अधिक आश्चर्यजनक म्हणजे, याच ठिकाणी एक पर्यायी पाऊस पाणी लाईन नगर पंचायत मार्फत पावसाळा काळात खोदण्यात आली, पण त्याने समस्येचा नायनाट करण्याऐवजी ती अधिक बिघडवली आहे... पाण्याचा निचरा करण्यासाठी खड्डा खणला गेला होता, पण तो आता मातीने भरून टाकण्यात आला आहे... त्यामुळे सांडपाणी तिथेच साचून सडत आहे... या भागात कचर्याचा मोठा ढिगारा पडलेला आहे... गवत आणि प्लास्टिक कचऱ्याने निचऱ्याची व्यवस्था पूर्णपणे बंद झाली आहे. दुर्गंधीने संपूर्ण परिसर त्रस्त आहे... हे सांडपाणी आता खांडाड गावाकडे जाणाऱ्या पावसाच्या नाल्यात शिरून धोका निर्माण झाला आहे...
"दुर्गंधी सहन होत नाही. उन्हाळ्यात आणि आता पावसाळा येत असल्याने पाणी घरात शिरण्याची भीती वाटते," असे एक स्थानिक नागरिक म्हणाले. ही परिस्थिती पाहून श्री. ज्ञानदेव पोवार यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली... "ड्रेनेज लाईन फेल, माती भरलेले खड्डे, कचऱ्याचा डोंगर – हे सर्व अपयश आहे प्रशासनाचे. यात जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई झालीच पाहिजे," असा त्यांचा ठाम इशारा आहे... पावसाळा तोंडावर आहे... वेळ फारच थोडी उरली आहे. प्रशासन आणि संबंधित विभागांनी आता तरी जागे व्हावे, अन्यथा ही समस्या सार्वजनिक आरोग्य संकटकडे नेण्याची शक्यता नाकारता येणार नाही... तत्काळ उपाययोजना, तांत्रिक हस्तक्षेप, आणि दोषींच्या चौकशीसह कठोर कारवाई हीच नागरिकांची मागणी आहे...
