माणगाव :- (नरेश पाटील)
मुंबई-गोवा महामार्गावर मागील २३ दिवसांपासून सुरू असलेली तीव्र वाहतूक कोंडी माणगाव परिसरातील जनजीवनासाठी मोठे संकट बनली आहे... सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत अविरतपणे अवजड वाहने आणि पर्यटकांच्या गाड्यांचा ओघ सुरूच असतो. परिणामी, संपूर्ण दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहेत... नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले असून, बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. ग्राहक दुकानांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, व्यवसायांवर याचा थेट परिणाम झाला आहे... या कोंडीमुळे कामावर जाणारे कर्मचारी, रुग्णवाहिका, बाजारात येणारे ग्राहक आणि कार्यालयीन कामांसाठी बाहेर पडणारे नागरिक हे सर्वजण वेळेवर आपल्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत... त्यामुळे आर्थिक नुकसानासोबतच नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रासही मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे. बाजारपेठ गाठणे देखील जणू एक दिव्य झाले आहे. पूर्वी ही वाहतूक कोंडी केवळ शनिवार-रविवार आणि सुट्ट्यांपुरती मर्यादित असायची... मात्र आता ती नित्याचीच झाली असून आठवड्याच्या प्रत्येक दिवशी तीच गंभीर परिस्थिती दिसून येते. त्यामुळे वीकएंड किंवा परतीच्या प्रवासालाच जबाबदार धरणे हे चुकीचे ठरत आहे... नागरिकांचे म्हणणे आहे की ही कोंडी वाहनांच्या प्रचंड ओघामुळेच होत असून, ती आता सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे... काही प्रमाणात अवकाळी पावसामुळे दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती... परंतु पावसाच्या थांब्यानंतर कोंडी पुन्हा तीव्रतेने सुरू झाली आहे... ठोस उपाययोजनांचा अभाव यामुळे ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आह.... माणगाव परिसर जणू वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकून गेला आहे... म्हणूनच माणगाववासीयांना केवळ तात्पुरत्या उपाययोजनांची नव्हे, तर कठोर आणि ठोस निर्णयांची तातडीने गरज आहे... अन्यथा येणाऱ्या काळात ही वाहतूक कोंडी आणखी गंभीर रूप धारण करू शकते...