महाराष्ट्र वेदभुमी

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, पती-पत्नी जागीच ठार


विजयादशमीला नवदाम्पत्यावर काळाचा घाला

कांद्री रेल्वे क्रांसिंगजवळ भीषण अपघात

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- विजयादशमीच्यानिमित्त कांद्री माईन्स येथे राहणार्‍या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असतांना दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. ट्रकने मोटरसायकल जोरधार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघतात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. प्रियंका सुनिल मरसकोल्हे (२२,) व सुनिल इतरु मरसकोल्हे (२८) रा. बडेगाव ता. सावनेर असं मृत दाम्पत्याचे नाव आहे. सदर घटना रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ वरील क्रांद्री माईन्स रेल्वे क्राँसिंगजवळ गुरवार (दि.०२) आँक्टोबरला दुपारी ०३.३० वाजताच्या सुमारास घडली...

प्राप्त माहितीनुसार मरसकोल्हे दाम्पत्य एमएच-४०/सी.एन.-८१४७ क्रमांकाच्या दुचाकीने विजयादशमीनिमित्त कांद्री माईन्स येथे राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते. दरम्यान त्यांची दुचाकी रस्ता ओलांडत असताना जबलपूरकडून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या एन. एल. -०१/ए.बी.-९९९० क्रमांकाच्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की दुचाकीस्वार पती-पत्नी दोघेही खाली पडले. याचवेळी ट्रकचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर ट्रक अनियंत्रित होत महामार्गाच्या खाली गेला होता. घटनेची माहिती तत्काळ रामटेक पोलिसव ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी यांना देण्यात आली. वैद्यकीय टीम डॉ. दीपेश पांचेश्वर, डॉ. गजभिये, पीआरओ पांडुरंग वाघाडे, नितेश नेवारे व कुंजीलाल तुमडाम यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. रामटेक पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गावरील अपघात वाढत असल्याने सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे...

वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न

सुनील आणि प्रियंका यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. दोघांचाही आनंदाने संसार सुरू असतानाच विजयादशमीच्या दिवशी त्यांच्यावर काळाने घाव घातला. अपघाता झालेल्या मरसकोल्हे दाम्पत्याच्या मृत्यूने बडेगावसह सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विजयादशमीसारख्या सणाच्या दिवशी घडलेल्या या अपघाताने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाइकांनी शासनाकडून कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post