सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- ग्रामीण भागातील दारिद्रय निर्मूलन करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून व ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची उमेद अभियान सुरुवात केली. जिल्ह्यात २०१२-१३ पासून हे अभियान राबविले जात आहे. ग्रामीण महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित करून त्यांचा सामाजिक स्तर वाढविणे, त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांना शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा उद्देश आहे. रामटेक तालुक्यातील नगरधन येथे “उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान” अंतर्गत आदर्श वृंदावन प्रभागसंघाच्या, मैत्री उत्पादक गटाचा महिलांनी गावातच सुपारीचा उद्योग सुरु केला. या उद्योगातून होणाऱ्या नफ्यातून त्यांचे जीवनमान उंचावत चालले आहे. उमेदच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास आणि संघटनशक्ती निश्चितच कौतुकास्पद आहे. राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोंनती अभियानाची सुरुवात २०११ मध्ये केली. महाराष्ट्र राज्यात या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास विभांगांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोंनती अभियान 'उमेद' या स्वतंत्र संस्थेची स्थापन करण्यात आली. या अभियानाची अंमलबजावणी राज्यातील ३५ जिल्हे व ३५१ तालुक्यात पूर्ण ताकदीने अभियान राबविले जात आहे. उमेद अभियानांतर्गत ग्रामीण भागात राहत असलेल्या गरजू महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करता यावा. स्वतःचा उद्योग सुरू करून पुरूषांच्या बरोबरीने प्रगती करता यावी. महिलांना स्वयंरोजगारासाठी किंवा वैयक्तिक गरजांसाठी २० लक्ष रुपयापर्यंतचे कमी व्याजदरावर कर्ज दिले जाते. उमेदच्या माध्यमातून महिलांना बचत करण्याची सवय लागली असून त्यांच्यात स्वयंरोजगारासह बँकेचे व्यवहार करण्याची क्षमता विकसित झाली आहे. अनेक महिला बँकेमार्फत कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय करत आहेत...
योजना नव्हे अभियान!
दारिद्र्य निर्मूलनासाठी समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांना प्रेरित करून ग्रामीण भागातील गरीब जनतेच्या सक्षम व स्वायत्त संस्था उभारून त्यांना वित्तीय सेवांचा लाभ मिळवून देत उपजीविकेचे सर्वांगीण आणि शाश्वत स्रोत निर्माण करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे...
महाराष्ट्रात या अभियानाला 'उमेद' असे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक उपेक्षित, वंचित, सक्षम होण्यास सिद्ध असणाऱ्या ग्रामीण नारीशक्तीची उमेद राज्यातील ७१ लाखांपेक्षा जास्त ग्रामीण महिलांचे हक्काचे व्यासपीठ ठरले आहे...