माणगाव :- (नरेश पाटील) राज्यात यंदा मान्सूनचा आगमन नेहमीपेक्षा जवळपास महिनाभर आधीच झाल्याचे नोंदवण्यात आले असून, त्याचा प्रचंड परिणाम रायगड जिल्ह्यात जाणवत आहे. सामान्यतः जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर मान्सून दाखल होतो... मात्र यंदा हवामानातील बदल एप्रिलपासूनच जाणवू लागले होते...रायगडमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली होती, तर ८ मेपासून प्री-मान्सूनच्या सरींचा जोर वाढत गेला...
१३ मेपासून हवामानात लक्षणीय बदल दिसून आला... आकाश निरभ्र असूनही दिवसभर गार वारे वाहू लागले, ज्यामुळे नागरिकांमध्ये बदलत्या हवामानाबाबत चर्चा रंगू लागली. या हवामान बदलाची खात्री ८ मेपासून झालेल्या सततच्या पावसाने पटवून दिली... मे महिन्यात विक्रमी पर्जन्यमानाची नोंद झाली असून, तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस मान्सूनने महाराष्ट्रात अधिकृत प्रवेश केला...
माणगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अतीभारी पावसाचा अनुभव सुरू आहे... परिणामी, २६ मे रोजी माणगावात हंगामातील पहिल्या पुराची नोंद झाली... नद्या दुथडी भरून वाहत असून, खांदाड भागात पुराचे पाणी खालच्या वस्तीमध्ये शिरले आहे... त्यामुळे त्या परिसरात पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली असून, स्थानिक नागरिकांची गैरसोय झाली आहे...
भारतीय हवामान विभागानुसार, यंदा अरबी समुद्रातील तापमानातील चढ-उतार, एल-निनो आणि लानीना यांसारख्या हवामान घडामोडीमुळे मान्सूनच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला आहे...
या अनपेक्षित पावसामुळे शेती, आरोग्य व जीवनशैलीवर परिणाम होण्याची शक्यता असून, हवामान बदलाचे हे लक्षण शाश्वत नियोजनाची गरज अधोरेखित करते... रायगड प्रशासन सज्ज असून, मदत केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे... नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे...