महाराष्ट्र वेदभुमी

थळ येथे सत्यनारायणाला चक्क नागराज प्रकटले.! ,

भाविकांमध्ये उडाली एकच खळबळ,

सर्पमित्र राम राऊत यांनी दिले नागाला जीवदान,

सोगाव - अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील थळ येथील पारोडा येथील समाज मंदिरात रविवार दि. २५ मे २०२५ रोजी सालाबादप्रमाणे होणाऱ्या सत्यनारायणाच्या पूजेवेळी धक्कादायक घटना घडली, पूजा सुरू असताना अचानक भला मोठा नाग मंदिरात आल्याने भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली... यावेळी प्रसंगावधान राखून उपस्थित सर्पमित्र राम राऊत यांनी नागाला सुरक्षितरीत्या पकडून नैसर्गिक निसर्गाच्या सानिध्यात सोडून देत जीवदान दिले, याबद्दल सर्पमित्र यांचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे...

    याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की, थळ येथील पारोडा येथील समाज मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे वरील तारखेला श्री. सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती. यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, यावेळी संध्याकाळी ७ वाजेदरम्यान मंदिरात भाविकांच्या उपस्थितीत आरती सुरू झाली असताना तेथे अचानक भला मोठा नाग मंदिरात आला, नागाला पाहून भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली... त्यावेळी तेथे पूजेसाठी उपस्थित सर्पमित्र राम राऊत यांनी प्रसंगावधान राखून भाविकांना धीर देत नागाला सुरक्षितरीत्या आपल्या कला कौशल्याने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. यामुळे पूजेसाठी आलेल्या भाविकांनी एकच सुटकेचा श्वास घेतला... 

 यावेळी थळ येथील सर्पमित्र यांनी थळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांना आवाहन करताना सांगितले की, पृथ्वी तळावरील प्रत्येक सजीव प्राणी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असतो, पावसाळ्यात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या बिळात पाणी गेल्याने व वाढत असलेल्या प्रदूषणामुळे सर्व प्रकारचे प्राणी सध्या अन्नाच्या शोधात नागरी वस्तीत येत आहेत, आपल्या आसपास असे विषारी अथवा बिनविषारी सरपटणाऱ्या व इतर कोणत्याही प्राण्यांना न मारता त्यांच्याकडे लक्ष ठेवून आम्हाला पुढील मोबाईल नंबर ९०४९६५५३३९ यावर संपर्क साधावा, आम्ही त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडून देऊन त्या प्राण्यांना जीवदान देण्याची जबाबदारी नक्कीच पार पाडू, असे शेवटी सांगितले...

फोटो लाईन : थळ - पारोडा येथील समाज मंदिरात सत्यनारायणाच्या पूजेदरम्यान आलेल्या नागाला पकडताना सर्पमित्र राम राऊत व उपस्थित भाविक,

Post a Comment

Previous Post Next Post