महाराष्ट्र वेदभुमी

गोंडी चित्रकला कार्यशाळेच्या दुनियेत हरवले विद्यार्थी


विद्यार्थ्यांना लाभले 'चित्रकला' तुन लोककलेचे प्रशिक्षण

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा जपण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलतेला चालना देण्यासाठी बनियन ट्री फाउंडेशनच्या वतीने गोंडी चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. नुकतेच अमलतास सिल्लारी येथे पार पडलेल्या या कार्यशाळेला स्थानिक शाळांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार, जयसेवा आदर्श हायस्कूल पवणी, सी.एम. राइज विद्यालय खमारपानी आणि शासकीय हायस्कूल देवरी येथील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. गोंडी चित्रकलेच्या बारकाव्यांचे आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी सुप्रसिद्ध कलाशिक्षक धनंजय पाठक आणि निखिल आत्राम यांनी मार्गदर्शन केले. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बनियन ट्री फाउंडेशनचे प्रकल्प प्रमुख संजय करकरे, तसेच जगदीश धारणे, सुनील वेळेकर, संजय धोटे, रमण साहू, सरिता वंदेवार, याशिका इवनाती, संदीप उईके आणि गजेंद्र धूर्वे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत गोंडी कलेचे सांस्कृतिक महत्त्व उलगडून सांगितले. संजय करकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, "ही कला केवळ चित्रांपुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या आदिवासी समाजाच्या जीवनशैलीचा, निसर्गाशी असलेल्या नात्याचा आणि परंपरांचा आरसा आहे. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना रंगांच्या माध्यमातून व्यक्त करताना वाघ, वटवृक्ष, मासे आणि निसर्गातील विविध घटकांची चित्रे रंगवली. प्रत्येक चित्रामागे एक कथा असते, हे समजून घेताना विद्यार्थ्यांचे कौशल्य फुलून आले. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात कलाशिक्षकांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेतील तंत्रे समजावून दिली, तसेच पारंपरिक आणि आधुनिक शैली यांचा समन्वय कसा साधायचा याचे मार्गदर्शनही केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोककलेबद्दल अभिमान निर्माण झाला असून, भविष्यातही अशा कार्यशाळा घेऊन या कलेला नवसंजीवनी देण्याचा संकल्प बनियन ट्री फाउंडेशनने व्यक्त केला आहे. स्थानिक शिक्षण संस्थांनीही अशा उपक्रमांचे स्वागत करत भविष्यातील सहकार्याची ग्वाही दिली...

Post a Comment

Previous Post Next Post