महाराष्ट्र वेदभुमी

तांबडी प्रकरणातील आरोपी निर्दोष, निकाल प्रचंड धक्कादायक, सर्व समाजातून संतापाची लाट

घटना घडली नाही का? मंगळवारी पोलीस ठाण्यावर मोर्चा, पत्रकार परिषदेत दिली माहिती 

आरोपींना कठोर शिक्षा होईल म्हणणारे ॲड उज्वल निकम यांच्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त 

रोहा - प्रतिनिधी  :- सबंध राज्याला हादरवून सोडलेली, सरकारतर्फे चालवण्यात आलेल्या फास्ट ट्रकवरील पीडीत अत्याचार व खून तांबडी प्रकरणातील सर्वच आरोपींची माणगांव सत्र न्यायालयाने गुरुवारी निर्दोष सुटका केली... सर्व आरोपींची निर्दोष सुटका होणे, हा न्यायालयीन निकाल फारच धक्कादायक आहे... त्यामुळे पीडितेची बाजू मांडण्यात सरकारी वकील उज्वल निकम कमी पडले, तपासात काय त्रुटी होत्या, तपास पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका हेतूत:  संशयास्पद आहे... मग घटनाच घडली नाही का ? असा सवाल उपस्थित होत तालुक्यातील सर्व समाजातून संतापाची लाट उसळल्याचे शनिवारी समोर आले... या निकालानंतर सबंध तालुका आक्रोशाने अक्षरशः ढवळून निघाला. आरोपींची निर्दोष सुटका होण्याचा निकाल दुर्दैवी आहे... तपास यंत्रणेचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत शनिवारी सकाळी रोहा येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित मराठा समाजासह सर्व बहुजन समाजाने मंगळवारी रोहा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचे संकेत दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे..

जुलै २०२० रोजी तांबडीतील पीडीतेवर अत्याचार व नंतर खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती... घटनेने सबंध जिल्हा हादरून गेला. पीडितेच्या न्यायासाठी सर्व समाज रस्त्यावर उतरला होता... राज्यातील अनेक नेत्यांनी आरोपींना तत्काळ अटक व प्रकरण फास्ट ट्रकवर चालवण्याची मागणी केली... दिवंगत नेते विनायक मेटे यांनी हा गंभीर विषय लावून धरला... आ प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, दिवंगत माणिकराव जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली होती... तत्कालीन आघाडी सरकारच्या काळातील ना आदिती तटकरे, खा सुनिल तटकरेंनी पीडीतेला न्याय देण्यासाठी कठोर पाऊले उचलली... सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची निवड करणे, खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी तटकरे यांनी पाठबळ दिले... तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तांबडी घटनास्थळी भेट घेत खटला सरकारतर्फे फास्ट ट्रकवर चालवण्याचे जाहीर केले... तरीही खटला तब्बल ५ वर्षाहून अधिक काळ चालला, अखेरच्या क्षणापर्यंत संबंधीत आरोपींना कठोर शिक्षा होईल असे सांगणारे ॲड उज्वल निकम यांना निकालात सपशेल अपयश आले... सर्वच आरोपी सत्र न्यायालयात दोषमुक्त झाले... ही घटना समजताच संवेदनशील समाजाने आक्रोश व्यक्त केला... हा निकाल आम्हाला मान्य नाही म्हणत समाजाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त केला... यावेळी  राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष समीर शेडगे, भाजपचे अध्यक्ष अमित घाग, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख, विभागीय नेते उदय शेलार, रमेश वायकर, महेश सरदार, अमित मोहिते, ॲड दीपक सरफळे, शाम लाड, हरेश नायनेकर, राजेश म्हांदलेकर यांसह विविध समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...

आम्हाला हा निकाल मान्य नाही... घटना घडलीच नाही असाच हा निकाल आहे...ना आदिती तटकरे, खा सुनिल तटकरे यांनी हा निकाल दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे... पीडीतेला न्याय देण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करू असे सांगितल्याची माहिती देत प्रसंगी आक्रमक पवित्रा घेऊ अशी भूमिका माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी यावेळी व्यक्त केली...

हे आरोपी नाहीत मग आरोपी कोण, समोर का आणले नाहीत हा तपास यंत्रणेचा अपयश आहे... ॲड उज्वल निकम यांनीही समाजाला, पीडित कुटुंबाला गाफील ठेवले, निकालाचा दिवसही आम्हाला कळविला नाही असा संताप रमेश वायकर यांनी व्यक्त केला...

मंगळवारी सर्व समाजाच्या वतीने मारुती चौक ते पोलीस ठाणे असा मोर्चा काढल्याचे आयोजन होत आहे‌, आमच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी माहिती वजा ईशारा अध्यक्ष आप्पा देशमुख यांनी दिला... उदय शेलार, अमित घाग, महेश सरदार व अनेकांनी मत व्यक्त केले... दरम्यान, आरोपींच्या निर्दोष सुटकेनंतर प्रशासनच्या नाकर्तीपणा विरोधात मंगळवारी सर्व समाजाच्या वतीने मोर्चा काढण्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे तर पीडीतेच्या न्यायासाठी मोर्चा व मागण्यांच्या पार्श्वभूमीवर एकंदर प्रकरणाला काय कलाटणी मिळते, नेमके काय घडते, संबंध रोहेकरांची काय आक्रमकता राहते ? याकडे सबंधं जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे...

प्रतिक्रिया

तांबडी अत्याचार व हत्या प्रकरणी लागलेला निकाल हा अत्यंत अन्यायकारक आणि दुर्दैवी आहे... कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, उच्च न्यायालयात जाण्याची तयारी आहे अशी प्रतिक्रिया महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली,

या निकालाबाबत ॲड  उज्वल निकम यांच्याशी चर्चा केली... तपासातील त्रुटी लक्षात घेत सखोल चौकशीचे सबंधीतांना निर्देश देण्यात आलेत, पिढीतेच्या न्यायासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करू अशी ग्वाही खा सुनिल तटकरेंनी दिल्याने पुढे काय होते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post