महाराष्ट्र वेदभुमी

669 ग्रॅम वजनाचा हापूस आंबा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू; आ. महेंद्र दळवी यांच्यासह विविध स्तरातून कौतुक.



रायगड (नरेश पाटील):अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध आंबा बागायतदार डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या बागेत तब्बल 669 ग्रॅम वजनाचा हापूस आंबा आढळून आला आहे... या उल्लेखनीय घडामोडीचे सर्वत्र कौतुक होत असून, आमदार महेंद्र दळवी, एफएमसी मार्केट नवी मुंबई वाशी येथील व्यापारी वर्ग, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी डॉ. पाटील यांचे विशेष अभिनंदन केले आहे...

हापूस आंब्याच्या उत्पादनासाठी रायगड जिल्ह्यातील स्वर्गीय मारुती नागू पाटील उर्फ मारुती मास्तर यांचे मोलाचे योगदान लक्षात घेण्याजोगे आहे. त्यांनी अलिबाग तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात हापूसच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनाची परंपरा निर्माण केली... त्यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब व्यवसायात सक्रिय असून, दरवर्षी एफएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्यांची निर्यात केली जाते...

तथापि, 2022 ते 2025 या कालावधीत बदलत्या हवामानामुळे, विशेषतः अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याच्या निर्यातीत सुमारे 60 टक्के घट झाली आहे... यामुळे अलिबागसह रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत... उत्पादनातही 30 ते 35 टक्क्यांनी घट झाली असून, खर्च मात्र वाढले आहेत...

औषधे, खते, फवारणी, मनुष्यबळ यावर मोठा खर्च होतो... परंतु उत्पादन मर्यादित असल्याने बागायतदारांना मोठा फटका सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर बागायतदारांकडून जिल्हा प्रशासन, कृषी विभाग आणि संबंधित मंत्र्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे...

सध्या जरी काही उत्कृष्ट हापूस आंबे उत्पादनात दिसून येत असले, तरी हवामानातील अनिश्चिततेमुळे संपूर्ण उद्योगावर संकट घोंगावत आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना होणे गरजेचे आहे, अशी बागायतदारांची अपेक्षा आहे...

Post a Comment

Previous Post Next Post