माणगाव :- (नरेश पाटील) २५ व २६ मे २०२५ रोजी मसळा व माणगाव तालुक्यातील १२ आदिवासी वाड्यांमधून सुमारे १५० बालकांना एकत्र आणत सर्व विकास दीप संघटनेने दोन दिवसीय ग्रीष्मकालीन प्रेरणादायी शिबीर आयोजित केले. या शिबिराचा उद्देश मुलांच्या आत्मभान, आरोग्य, शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा होता. 'मी कोण आहे?', 'माझी स्वप्ने काय आहेत?', 'मी समाधानी आहे का?' यांसारख्या आत्मचिंतनात्मक प्रश्नांद्वारे मुलांना स्वतःबद्दल विचार करण्याची संधी मिळाली. यासोबतच स्वच्छता, आरोग्य, आणि बालविवाहाबाबत जनजागृती करण्यात आली. मुलांना चाईल्ड हेल्पलाइन व गावातील बाल संरक्षण समित्यांची माहिती देण्यात आली...
आदिवासी भागातील अस्मिता हिची संघर्षमय यशकथा सर्वांना प्रेरणा देणारी ठरली. ती सध्याबी.एस्सी. च्या शेवटच्या वर्षाला असून, तिच्या शब्दांत — "स्वप्ने मोठी बघा, शिक्षण पूर्ण करा, लवकर लग्न करू नका." खर्डी येथील जलप्रवास आणि विविध खेळांमुळे शिबिर आनंददायी ठरले. दुसऱ्या दिवशीच्या संकल्प सत्रात अनेक मुलांनी पुढच्या वेळी अधिक मित्रांसोबत येण्याची हमी दिली. ही प्रेरणादायी मोहीम फा. थॉमस, फा. मॅथ्यू व त्यांच्या संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नांमुळे यशस्वी झाली...