महाराष्ट्र वेदभुमी

नगरपरिषद हद्दीत ग्रामपंचायतींची कर आकारणी


प्रख्यात रामटेक नगरीत अनोखा प्रकार उघडकीस

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- स्थानिक नगरपालिका हद्दीमध्ये येत असलेले रहिवासी नागरीक तथा व्यावसायीकांकडून न.प. प्रशासनातर्फे कर 'आकारणी करणे अपेक्षीत असतानाही मात्र रामटेक न.प. हद्दीतील काही भागातील रहिवासी नागरिक तथा व्यावसायीकांकडून चक्क आजूबाजूच्या ग्रामपंचायती कर आकारणी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार माजी नगरसेवक धोपटे यांच्या पुढाकारातून उघडकीस आला आहे... सदर प्रकरण धोपटे यांनी उचलून धरत स्थानीक नगरपरिषद प्रशासनाने याप्रकरणी त्वरीत कारवाई सुरु करावी व ग्रामपंचायतींचा हस्तक्षेप दुर करून यासर्व भागात नगरपरिषद प्रशासनाने कर वसुली तथा विकासकामे करावी अशी मागणी माजी नगरसेवक व अभ्यासु व्यक्तिमत्व असलेले दामोधर धोपटे यांनी नगरपरिषद प्रशासनाला केली आहे...

याबाबद नगरसेवक दामोधर धोपटे यांनी सांगितले की, रामटेक नगरपालिकेचा सुधारित विकास आराखड़ा वर्ष १९९३ ला महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीकरीता प्रस्तावित करण्यात आला... संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून सदर प्रस्तावास ६ ऑक्टोबर २००१ ला उपसचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्यासह मुख्य कार्यालय, नगर रचना विभाग, पुणे यांनी मंजुरी दिली... तत्कालीन अध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यासह नगर रचनां विभाग, नागपूर यांनी त्यास स्विकृती दर्शविली, परंतु दुर्दैवाने अद्यापपर्यंत कोणीही याकडे लक्ष दिले नाही. उलट अनेकदा हद्द वाढीबाबतचे ठराव घेऊन पांढरे कागद काळे करीत राहिले... खऱ्या अर्थाने ६ ऑक्टोबर २००१ ला मंजूर विकास आराखड्याच्या प्रसतावावरती अंमलबजावणी करून भविष्यकालीन वाढीव प्रस्ताव तयार करणे आवश्यक होते... परंतु तसे झाले नाही. तेव्हा स्थानिक नगर परिषद प्रशासनाने याकडे आतातरी जातीने लक्ष देऊन योग्य कार्यवाही करावी अशी मागणी माजी नगरसेवक तथा या प्रकाराविषयीचे गाढे अभ्यासक दामोधर धोपटे यांनी रामटेक न.प. प्रशासनाला नुकतीच केलेली आहे...

न.प. प्रशासनाने कर आकारणी न केलेल्या भागामध्ये अंबाळा तलावाच्या पूर्वकडील भाग, गौळणी नाल्याचा पूर्वकडील भाग, जैन मंदिराचा आजूबाजूचा परिसर, कालंदा देवी मंदिराचा मागचा संपूर्ण भाग (कवडंक), दुधाळा बायपास रोडलगतच संपूर्ण भाग आदी परिसराचा समावेश आहे. हा भाग न.प. हद्दीत येत असतानाही रामटेक शहरालगतच्या काही ग्रामपंचायती येथे कर आकारणी करित आहे...

मी चौकशी करून पुढील कार्यवाही करते - मुख्याधिकारी राऊत

आपल्या शिस्तबद्ध कार्यप्रणालीसाठी चर्चेत असलेल्या रामटेक नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांना या प्रकाराविषयी विचारणा केली असता ' उपरोक्त सर्व स्थळांवर जावुन मला पहाणी करावी लागेल, चौकशी करावी लागेल व त्यानंतर पुढील कार्यवाही करावी लागेल, तेव्हा येत्या आठ दिवसात मी या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करते असे त्यांनी सांगीतले...

Post a Comment

Previous Post Next Post