मनरेगा अंतर्गत मजुरांचे पैसे त्वरित खातेजमा करा - सरपंच सावरकर
मजुरांवर आली उपासमारीची वेळ
साहित्यांची बिले दोन वर्षांपासून प्रलंबित
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक -: ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेकडो मजुरांना काम देऊन शासन त्यांना रोजगार देत असते व मजुरीच्या स्वरूपात त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करीत असते आणि या मजुरीच्या पैशावरच त्या मजुरांसह त्यांच्या परिवाराचा संसाराचा डोलारा उभा असतो... महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीच्या कामांवर काम करीत असलेल्या मजुरांच्या खात्यात आठवडाभरात रक्कम जमा केली जात असताना २०२३-२०२४ व २०२४-२०२५ या दोन वर्षाचे सरकारने मजुरांच्या खात्यात रक्कम जमा केलेली नसून त्यामुळे या मजुरांना ऐन सणासुदीच्या काळात उधार, उसनवार करून उपासमारीची वेळ आली आहे... मजुरीचा निधी त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करावा अशी मागणी गट ग्रामपंचायत मानापुरचे सरपंच संदीप सावरकर यांनी शासनाला केलेली असून विलंब लागल्यास त्याच मजुरांना सोबत घेऊन मी आंदोलन करणार असल्याची धमकी वजा चेतावणी सरपंच संदीप सावरकर यांनी शासनाला दिलेली आहे...
हप्ताभर म्हणा की महिनाभर म्हणा काम पूर्ण झाल्यावर मजूरवर्ग पैसे घेतल्याशिवाय थांबत नाही... कारण या पैशांवरच त्यांचा संसारगाडा चालत असतो विशेषतः आठवडी बाजार करणे भाजीपाल्यांसह अन्नधान्य घरात भरणे आणि त्याच्यावर आपलं खानपान चालवणे एकंदरीत हातावर आणून पानावर खाणे अशी त्यांची जीवनशैली असते... मात्र शासनाकडून मनरेगाचा निधी थांबल्यामुळे सध्या घडीला त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे सरपंच संदीप सावरकर यांनी खंत व्यक्त करीत सांगितले... महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत सन २०२३- २४ व सण २०२४-२५ या आर्थिक वर्षात वैयक्तिक लाभाचे कॅटल शेड, गोट शेड, सिंचन विहीर व सार्वजनिक लाभाचे सिमेंट रस्ते, खडीकरण रस्ते यांची कामे पूर्ण झालेली आहेत... असे असले तरी मात्र यामध्ये काम करणाऱ्या मजुरांचे पेमेंट अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही... नियम असा बोलतो की अशा मजुरांच्या खात्यात पंधरा दिवसांच्या आत पेमेंट जमा होणे बंधनकारक आहे मात्र येथे शासनानेच शासनाच्या नियमाला तिलांजली दिल्याचे दिसून येत आहे... त्याचप्रमाणे वरील दोन्ही आर्थिक वर्षांमध्ये साहित्याची बिले अद्याप पर्यंत अदा करण्यात आलेले नाही... गावातील नरेगाची कामे खोडांबली असून ती कशी पूर्ण होईल असा बिकट प्रश्न सरपंच संदीप सावरकर यांचे पुढे उभा ठाकला आहे...
अन्यथा मजुरांना सोबत घेऊन आंदोलन करणार - सरपंच सावरकर
आमदार खासदारांचे पेमेंट, पेन्शन मध्ये सातत्याने वाढ करणाऱ्या या शासनाजवळ मनरेगाच्या मजुरांचा पेमेंट देण्यासाठीही निधी नसावा हा हास्यास्पद प्रश्न येथे उभा झालेला आहे... मजुरांच्या तोटक्या मजुरीचा निधी तरी किती असणार आणि तो सुद्धा शासन वेळेवर देत नसेल तर आता काय बोलावे असे म्हणत सरपंच संदीप सावरकर यांनी शासनाच्या ढिसाळ कार्यप्रणालीप्रति खंत व्यक्त केली... मजुरी अभावी मजुरांवर व त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे... याबाबत हे सरकार गंभीर नाही तेव्हा त्वरित समस्या सोडवा अन्यथा मनरेगाच्या मजुरांना हाताशी धरून रामटेक पंचायत समिती तथा तहसील कार्यालयापुढे मी आंदोलन करणार अशी धमकीवजा चेतावणी सरपंच संदीप सावरकर यांनी शासनाला देशोन्नतीशी बोलताना दिली...