महाराष्ट्र वेदभुमी

खांब पंचक्रोशीत आषाढी एकादशी दिंडी सोहळा उत्साहात .


कोलाड (श्याम लोखंडे) 

 रोहा तालुक्यातील वारकरी संप्रदाय परंपरा लाभलेल्या श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीत आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी काढून हा सोहळा भक्तीमय वातावरणात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला...गेली ६८ वर्षाची अखंडपणे चालत आलेला दिंडी सोहळा सुरु ठेवणारे खांब पंचक्रोशीतील वारकरी ग्रामस्थ प्रति वर्षाप्रमाणे याहीवर्षी आषाढी एकादशी निमित्त तीर्थ क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी ते खांब विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दिंडी काढून दिवसभर विठू नामाच्या जयघोषात सामील झाले होते...यावेळी पंचक्रोशीतील वारकरी महीला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत विठू रखुमाईच्या चरणी मनोभावे तल्लीन होत या सुखमय सोहळ्याचा आनंद लुटला...

स्वा.सु.नि.वै.सद्गुरू गणपत बाबा गुडेकर (अलिबागकर महाराज ) वै. हभप गुरुवर्य गोपाळ बाबा वाजे, वै.हभप धोंडू बाबा कोल्हटकर पंढरपूर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीत तसेच त्यांच्या कृपाशीर्वादाने आजतागायत हभप नारायण दादा वाजे (अलिबाकर) दत्तू महराज कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हभप मारूती महाराज कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखाली ही परंपरा पुढे अविरतपणे चालू आहे... परंपरेने चालत आलेला हा दिंडी सोहळा येथील वारकरी श्री क्षेत्र तळवली ते खांब भगवी पताका खांद्यावर घेऊन महीला भगिनी डोक्यावर तुळस कळस घेऊन टाळ मृदंग जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा तुकोबाच्या हरिनामाच्या गजरात पायी दिंडी काढून खांब येथील मंदिरात विठ्ठल रखुमाईचे विधिवत पूजा करतात त्यानंतर दिंडीतून आलेले संत माय बाप यांची गळा भेट दर्शन हरि भजन सुश्राव्य कीर्तन सेवा असे आयोजन करण्यात आले होते... सदर दिंडीमध्ये खांब पंचक्रोशी आणी विभागातील अनेक वारकरी भक्तगण, आदिवासी मंडळी व भाविक सज्जन सामील होऊन या भक्तीच्या पुरात न्हाऊन आनंद लुटला...

तसेच हा दिंडी सोहळा उत्साहात पार पडण्यासाठी श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीच्या पदाधिकारी तसेच सेवेकाऱ्यानी अथक परिश्रम घेतले...

Post a Comment

Previous Post Next Post