रोहा दि. २३ मे, प्रतिनिधी :-
साचलेल्या नाल्यातील दुर्गंधीकडे पालिकेचे दुर्लक्ष ; शहरात जागो जागी कचराच कचरा
रोहा शहरातले छोटे मोठे नाले साचलेल्या मलव्याने गच्च भरलेले दिसून येत असून त्यामधून सुटणाऱ्या दुर्गंधी वास रोहा नगर पालिका प्रशासनाला मात्र काही केल्या येत नाही, साचलेल्या नाल्यांबरोबरच शहरात जागो जागी कचराच कचरा पडलेला दिसून येत आहे. साचलेले नाले आणि शहराची झालेली कचराकुंडीकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असून किमान पावसाळ्यापूर्वी ही नाले सफाई शंभर टक्के पूर्ण होईल का ? असा प्रश्न दरवर्षी रोहेकरांना पडत असतो...
पावसाळ्यात रोहा शहरातील नाले व गटार लाईनमध्ये पुराचे पाणी साठून व्यापारी बांधव व नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणुन रोहा नगरपालिका दर वर्षी पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचे काम हाती घेत असते, परंतु हे नालेसफाईचे काम हे नागरिकांपेक्षा ठेकेदार आणि पालिका प्रशासन यांच्यासाठी मलाईचे काम असल्याचे गेली काही वर्षे नागरिकांतून बोलले जात आहे. दरवर्षी या कामासाठी नगर परिषदेकडून सुमारे ५ लाख रुपयांहुन अधिक निधीची तरतूद केली जाते. यंदाही हे काम आपण सुरू केल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी यांनी गुरुवारी सांगितले, परंतु शहरात गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी केली असता कुठेही हे काम सुरू असल्याचे दिसून आले नाही. मेहेंदळे हायस्कुल, गिरोबा नगर, अंधार आळी, धनगर आळी, जवहार नगर, दमखाडी, सातमुशी नाला, एस. टी. स्टॅण्ड, स्मशानभूमी रोड, आडवी बाजार पेठ, फिरोज टॉकीज, वीर सावरकर रोड, अर्बन बँक समोरील, दमखाडी येथील सागर डेअरी, कोर्ट रोड आदी ठिकाणची छोटीमोठी नाले, गटार व मोऱ्या तुंबलेल्या दिसून आल्या. मुख्य हमरस्त्यावरील पिडब्ल्यूडी कार्यालया येथिल साचलेल्या नाल्यातून मोठी दुर्गंधी येत आहे...
मे महिना संपत आला तरी हे नाले साफ झालेले नाहीत, नालेसफाईची कामे हेतुपूर्वक उशिरा सुरू केली जातात, जेणेकरून ठेकेदाराला अधिक काम करावे लागत नाही, रोहा शहरात लगत असलेल्या कळसगिरी डोंगरपासून कुंडलिका नदीकडे उतार भाग असल्याने पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात नाल्यातील साचलेला मलवा नदी पत्रात वाहून जात असतो, त्यामुळे नालेसफाई ठेकेदाराला अधिक काम करावे लागत नाही...पालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्या संगतमताने कधीही नालेसफाईचे काम शंभर टक्के पूर्ण केली जात नसल्याची अनेक वर्षांची रोहेकर नागरिकांची ओरड आहे...
- शहरात जागो जागी कचराच कचरा -
स्वच्छ रोहा सुंदर रोहा ची भिंतीचित्रे ठिकठिकाणी रंगावणाऱ्या रोहा नगर पालिकेचे शहराच्या झालेंल्या कचराकुंडीकडे दुर्लक्ष झालेले दिसून आले, शहरात दुपार नंतरही जागोजागी कचराच कचरा दिसून आला, मुख्य हमरस्ता , मेहेंदळे हायस्कूल , शासकीय रुग्णालय आदी सार्वजनिक ठिकाणे कचरामय झालेली दिसून आली. वर्दळीच्या हमरस्त्यावर पहाटेपासून नागरिकांची लगबग सुरू होत असते, येथे लोकांना कचरा व नाल्याच्या दुर्गंधीने नाक मुठीत धरुन जावे लागते, स्वच्छता सर्वेक्षणाची प्रसिद्धी करणाऱ्या रोहा शहराची कचराकुंडी झाल्याचे गुरुवारी पाहण्यास मिळाले. रोहा नगर पालिकेचे कामगार नियमितपणे शहरात सकाळी स्वच्छता करून ठिकठिकाणी कचरा गोळा करून ठेवतात, परंतु कचरा वेळेत उचलला जात नाही, बऱ्याचद नाल्यांतुन बाहेर काढलेला ओला कचराही तीन तीन दिवस झाले तरी रस्त्यावर जैसेथेच असते. ते वेळेत उचलले जात नसल्याने लोकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो...
प्रतिक्रिया ;-
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम आपण सुरू केलेले आहे, तशा कामाचे आदेश ठेकेदाराला देण्यात आलेत, कुठे कुठे काम सुरू केले आहे याची माहिती घेऊन देतो, नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येतील. शहरातील ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याची बाबत आपण माहिती घेऊन आपणास कळवितो- पंकज भुसे, मुख्याधिकारी, रोहा नगर परिषद