सोगाव - अब्दुल सोगावकर :
नारळाच्या झाडावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला एअरबेडची असलेली गरज पूर्ण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व किहीम सरपंच पिंट्या गायकवाड हे पुन्हा एकदा देवासारखे मदतीला धावून आले, याबद्दल पिंट्या गायकवाड यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलिबाग तालुक्यातील झिराड येथे एक आदिवासी तरुण नारळाच्या झाडावरून पडून गंभीर जखमी झाला होता. या व्यक्तीला मुंबई जे.जे रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, यावेळी तिथे तातडीची मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
यानंतर काही दिवसांनी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करून झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात असलेल्या जखमा भरण्यास वेळ लागत होता. तसेच जखमा न भरल्यामुळे रुग्ण अत्यवस्थ होऊन वेदनेने विवळत होता. त्याला झालेल्या गंभीर दुखापत व जखमा यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी एअरबेडची नितांत गरज असल्याचे सांगितले, परंतु जिल्हा रुग्णालयात एअर बेड उपलब्ध नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून विकत आणण्यासाठी सांगितले. मात्र गरीब आदिवासी रुग्णाची व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. हि बाब एका व्यक्तीने पेझारी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रतिक पाटील यांना सांगितले, यावर प्रतिक पाटील यांनी रुग्णालयात प्रत्यक्षात जाऊन रुग्णाच्या परिस्थितीची माहिती घेतली व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सामाजिक कार्यकर्ते प्रतिक पाटील यांनी लगेच हि माहिती चोंढी येथील दानशूर व्यक्तिमत्त्व असलेले सामाजिक कार्यकर्ते व किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांना सांगितली. यावेळी पिंट्या गायकवाड यांनी मागे पुढे न पाहता सदर गरीब आदिवासी रुग्णास त्वरित एअर बेड उपलब्ध करून देत फार मोठा दिलासा दिला. त्यामुळे आज हा रुग्ण एअरबेडमुळे काहीसा वेदनामुक्त होऊन सुखाची झोप घेत आहे. या केलेल्या रुग्णसेवेबद्दल सामाजिक कार्यकर्ते व किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांचा अभिनंदनासह सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे...
यावर त्यांच्या एका नातेवाईक आदिवासी बांधवाने सांगितले की, आम्ही पिंट्या शेठच्या गावातलं तर नायच शिवाय त्याच्या किहीम पंचायत हद्दीतलं पण नाय, तरीही पिंट्या शेठ आमच्या मदतीला देवासारखा धावत आला, तो खरोखरच देवमाणूस आहे. त्याचे उपकार आम्ही इसरू शकत नाय, आम्ही सर्व आदिवासी लोक त्याचं आभार मानतो...
यावर पिंट्या गायकवाड यांना या मदतीबद्दल प्रतिक्रिया विचारली असता दिनदुबळ्यांची मदत करणे हे माझे परम कर्तव्य आहे, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने व माझे राजकीय व सामाजिक गुरू स्व. माजी आमदार मधूशेठ(पप्पा) ठाकूर यांनी मला संकटावेळी, सुखदुःखात गोरगरिबांच्या मदतीला धावून जाण्याच्या दिलेल्या शिकवणीने माझे कार्य मी केले व करीत राहणार आहे, यासाठी स्व. माजी आमदार मधूशेठ(पप्पा) ठाकूर यांचा आशीर्वाद माझ्यापाठीमागे असल्याचे सांगितले.
फोटो लाईन : गरीब आदिवासी रुग्णाला रुग्णालयात एअरबेडची मदत करताना सामाजिक कार्यकर्ते पिंट्या गायकवाड,