महाराष्ट्र वेदभुमी

कालव्याच्या पाण्यासाठी आत्मदहनाचा ईशारा! बळीराजाने घेतली आक्रमक भूमिका ; प्रशासनाने बजावली नोटीस.



रोहा - प्रतिनिधी ;- 

पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांकडून आंदोलनकर्त्यांची भेट, काम वेगाने उरकण्याचे पुन्हा आश्वासन

तालुक्यातील आंबेवाडी ते निवी कालव्याचा पाणी प्रश्न पेटला आहे, येथिल ग्रामस्थ २०१७ पासून कालव्याच्या पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत, त्यातून कालव्याच्या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली. परंतु लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वारंवार केवळ आश्वासने मिळाली, कालव्याला काही पाणी मिळाले नसल्याने सांगत येथील ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत, १ एप्रिल रोजी कोलाड येथिल धरणात उड्या घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिल्याने  सर्वत्र एकच खळबळ उडाली. प्रशासनाने या आंदोलनाला नोटीस बजावली आहे. तर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन हे काम वेगाने उरकण्याचे पुन्हा आश्वासन दिले, आता पाण्यासाठी बळीराजा संघटना नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...

मागील तीन वर्षापासून कालव्याच्या पाण्यासाठी येथिल ग्रामस्थांनी मोर्चे, आंदोलन, आमरण उपोषण, पाणी जागर अभियान आदी करीत आपला संघर्ष सुरू ठेवला आहे, परंतु आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्याबाबत लोकप्रतिनिधी, प्रशासनात गांभीर्य नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. आंदोलनकर्त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महत्त्वाची दुरुस्ती कामे मार्गी लागली. कालव्याच्या काही भागाला पाणी आल्याने संभे, पाले गावांना त्याचा फायदा झाला, मात्र दूरवर असलेली वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, निवी गावापर्यंत कालव्याचे पाणी आलेच नाही. त्यामुळे लांढर, बोरघर, तळाघर, गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. याची आमदार, खासदार, विभागीय नेत्यांना माहिती आहे. तरीही कालव्याच्या पाण्यासाठी तत्परता दाखवत नसल्याचे शेतकरी सांगतात. उर्वरीत मोजकी कामे मार्गी लागल्यास पाणी पूर्ववत सुरू होईल याकडे आंदोलनकर्ते ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आंदोलनकर्त्यांनी १ एप्रिल रोजी पाण्यासाठी आत्मदहन करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. महसूल व पाटबंधारे प्रशासनाची त्यामुळे झोप उडाली आहे.- प्रशासनाने बजावली नोटीस -

निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी आत्मदहन आंदोलनकर्ते ग्रामस्थांना नोटीस बजावत मज्जाव केला आहे. आत्महत्या हा भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा आहे. तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांना पाठवलेल्या नोटीसीत त्यांनी म्हटले आहे...-

 पाटबंधारे अभियंत्यांनी केली पाहणी -

कोलाड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद पवार यांनी या ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना कालव्याच्या दुरुस्ती कामाबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी याकामाची प्रत्यक्ष पाहणी केली व कामे वेगाने पूर्ण करून पाणी सोडण्याचे पुन्हा नवे आश्वासन पवार यांनी दिले.- 

आंदोलनाला दिला यासंस्थांनी पाठिंबा -

पाण्यासाठीच्या आंदोलनास सर्वहरा जनआंदोलन, रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान, मजूर फेडेरेशन, रोहा सिटीझन फोरम, कोकण मराठी साहित्य परिषद, रायगड प्रेस क्लब, रोटरी क्लब, कामगार संघटनांनी ग्रामस्थांना पाठबळ देत पाण्याच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेण्याचे जाहीर केले आहे.- 

बळीराजाच्या भूमिकेकडे लागले लक्ष - 

पाणी आंदोलनाच्या घडामोडीवर लवकरच पत्रकार परिषद घेऊन कालवा दुरुस्ती आणि लोकप्रतिनिधींच्या राजकारणावर बोलून कालव्याचा पाणी लढा आपण लोकांसमोर आणू असे बळीराजा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी सांगितले. पाण्यासाठी लढणारा बळीराजा आता नेमका काय पवित्रा घेतो, पाटबंधारे अधिकाऱ्यांची दुरुस्ती कामासाठी दाखविलेली तत्परता व पाणी सोडण्याचे दिलेले आश्वासन यावर आंदोलनकर्ते काय निर्णय घेतात ? हे लवकरच समोर येणार आहे... 

प्रतिक्रिया ;-

कालव्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना आत्मदहनाचा ईशारा द्यावा लागतो, ही गंभीर बाब आहे, हे लोकप्रतिनिधींचे अपयश आहे,  - उल्काताई महाजन, नेत्या, सर्वहारा जनआंदोलन

मागील तीन वर्षापासून पाण्यासाठी सतत संघर्ष सुरू आहे, याची दखल विधिमंडळात घेण्यात आली, परंतु राजकीय उदासीनतेमुळे पाणी शेतकऱ्यांना मिळत नाही. खासदार, आमदार या महत्त्वाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत, उलट आंदोलनकर्त्यांना खोटे ठरवण्याचे काम त्यांनी केलं आहे.  - राजेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते, रोहा

Post a Comment

Previous Post Next Post