देशाचा स्वातंत्र्यदिन ...विश्वास सानप
आज स्वातंत्र्यदिन...याच दिवशी १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले, पारतंञ्याचा अंधार चिरत स्वातंञ्याची एक ज्वाळा उजळुन निघाली...आणि त्यात संपूर्ण हिंदुस्थान न्हाऊन निघाला...असंख्य हुतात्म्यांचे आत्मे मुक्ती पावले... खरे तर आजचा दिवस स्वाभिमानाचा,आनंदाचा,हर्षाचा,देशासाठी बलिदान केलेल्या वीरांचा...अनेक हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेले हे स्वातंत्र्य आज आम्ही उपभोगतोय पण १५ ऑगस्ट सोडले तर इतर दिवस या देशभक्तांची,या क्रांतिकारकांची आम्हाला साधी आठवणही होत नाही... स्वातंत्र्याचा रक्तरंजीत इतिहास आम्ही कधी आळवतही नाही... ही स्वंतत्र भारताची शोकांतिका आहे...एवढेच नाहि तर स्वातंत्र्य दिनाला जो तिरंगा आम्ही अभिमानाने आणि गर्वाने फडकावतो त्याची सुद्धा तमा इतर दिवशी आमच्याकडून बाळगली जात नाही...
काळ बदलला तसा स्वांतञ्यदिनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला...हळूहळू हा दिवस आनंदात उत्साहात साजरा करण्याचे स्वरूप बदलू लागले... या दिवसाकडे सुट्टिचा दिवस म्हणून पाहिले जाऊ लागले... स्वतंत्र भारताचे सुजाण नागरीक असल्याचा आजच्या पिढीला विसर पडला...स्वातंत्र्यदिनाचे आपल्या जीवनातील विशेष महत्त्व काय हे पटवून देण्यासाठी खरे तर पालकांनी प्रयत्न करावयास हवे... ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे...परंतु पालकच एक दिवसाची सुट्टी साजरी करायला मुलांना बाहेर कुठे तरी घेऊन जातात... किंवा घरातच मनसोक्त आराम करतात... काही पालक स्वातंत्र्यदिन साजरा करतातही त्यांना सलाम पण वर्षातून एक दिवस राष्ट्रगाण म्हणून राष्ट्राचे कल्याण होत नसते ही गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल...
इतिहास किंवा इंटरनेटच्या माध्यामातून मुलांना स्वातंत्र्य लढ्याची अथवा इतर माहिती मिळतेच... परंतु स्वातंत्र्यसंग्रामाचे आपल्या जीवनातील विशेष महत्व पटवून देण्यासाठी पालकांनाच प्रयत्न करावे लागतील... मुलांमध्ये राष्ट्रभाव, राष्ट्रभक्ती कशी निर्माण होईल... याची काळजी घेणे पालकांचे आद्यकर्तव्य आहे...आज देश स्वतंत्र होऊन ७६ वर्ष होत ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना एक प्रश्न सतावत राहतो... स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रक्ताचा अभिषेक घातला त्यांच्या बलिदानाचा आम्हास विसर कसा काय पडला? ?? राष्ट्र म्हणून माझी भुमीका , माझे योगदान काय आहे या देशासाठी???? आज आत्मकेंद्रित झालेलो आम्ही शेजारी पाहायलाही वेळ नाही..
देशाच्या भौगोलिक सिमा राखणारे जवान देशासाठी प्राण तळहातावर घेऊन जगत असतात... पण या सीमारेषेच्या आतील नागरिकांच्या मनातील देशाबद्दल जे प्रेम, जी आत्मीयता, जी देशाबद्दलची कर्तव्य भावना,जो आदर या सर्वांचे रुपांतर नागरिकांच्या वागणूकीत अथवा आचरणात होत असेल तरच याला राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्रप्रेम म्हणता येईल... की एका दिवसाच्या झेंडा वंदनाने...देशभक्ती, देशप्रेम साध्य अथवा व्यक्त करण्यासाठी सीमेवरच लढाई करण्याची गरज नाही... देशातील एक जबाबदार नागरीक म्हणून देशहितासाठी काही मूलभूत कर्तव्य बजावणे सुद्धा देशभक्ती होऊ शकते... देशहिताला बाधक गोष्टी न करणे ही सुद्धा एक राष्ट्र भक्तीच आहे...
त्याचप्रमाणे एखादा चोरी लफंगेगीरी करुन उदरनिर्वाह करत असेल... एखादा नेता भ्रष्टाचार करुन पैसे कमवत असेल... एखादा धर्म अनुयायी दुसर्या धर्माबद्दल द्वेष पसरवत असेल... एखादा व्यापारी गिह्राईकाकडुन अव्वाच्या सव्वा पैसे उकळत असेल... एखादा शिक्षक गलेलठ्ठ पगार घेऊनही विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवत नसेल... एखादा विद्यार्थी काॅपी करुन पास होत असेल...एखादा हुंडा घेतल्याशिवाय लग्नाला तयारच नसेल...आणि हेच सर्व सकाळी उठल्याबरोबर देशसेवेचे गोडवे गात असतील... रोज न चुकता भारतमाता की जय म्हणत असतील... न चुकता झेंडावंदन करायला जात असतील... तर तेवढ्याने ते राष्ट्र प्रेमी ठरतील का??? की राष्ट्रभक्तीसाठी नागरिकत्वाच्या अजूनही काही व्याख्या आहेत...
नागरिकत्वाच्या कर्तव्यांचे कोण किती पालन करतो...कोण किती नैतीकतेने जीवनमान उंचावतो यावर देशप्रेमाची व्याख्या आपण कधी ठरवणार आहोत...??सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाने आप आपले काम शिस्तीने, प्रामाणिकपणे, नैतीकतेने, कर्तव्य तत्परतेने, सचोटीने, मेहनतीने, गुणवत्तपुर्वक पार पाडावे... जेणेकरून देश ऊन्नतीच्या शिखरावर विराजमान असेल... एक लक्षात घेतले पाहिजे बागेला स्वतःचा सुगंध नसतो, जो काही सुगंध पसरतो तो बागेतील फुलांचा असतो... म्हणूनच तर बागेतील फुलांमुळे बाग नावारूपाला येत असते..त्याचप्रमाणे राष्ट्रातील नागरिकांच्या अतुट देशभक्ती आणि देशप्रेमावर राष्ट्राचे भवीतव्य आणि विकास अवलंबून असतो... राष्ट्राच्या नागरिकत्वामुळे राष्ट्र उदयास आणि नावारुपाला येत असते...
विश्वास सानप
शिवशंभु प्रतिष्ठान रोहा, रायगड
