अलिबाग (ओमकार नागावकर) : पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यंत गंभीर प्रश्नावर उमटे धरण संघर्ष ग्रुप आक्रमक झाला असून, धरणातील गाळ काढण्यासाठी तात्काळ ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वाकडीकर यांची ॲड. राकेश पाटील यांनी, जि.प. सदस्य डॉ. सचिन राऊळ यांच्या उपस्थितीत भेट घेतली...
यावेळी संघर्ष ग्रुपकडून सविस्तर निवेदन सादर करण्यात आले...निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, जिल्हा परिषदेकडे सध्या १५ व्या वित्त आयोगाचा तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून, त्यापैकी केवळ ५ कोटी रुपये उमटे धरणाच्या गाळ काढण्यासाठी आणि शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी देणे अजिबात कठीण नाही... तरीही प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष संतापजनक असल्याचा आरोप करण्यात आला आहे...
गेल्या १२ वर्षांपासून उमटे धरण गाळाने भरत चालले असून, ३३ आदिवासी वाड्या आणि ४७ गावांतील नागरिकांना गढूळ, मातीमिश्रित पाणी पिण्याची वेळ आली आहे... सध्या चार दिवसांआड पाणीपुरवठा होत असून, तोही अशुद्ध असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे...
याहून धक्कादायक बाब म्हणजे, २०२२ साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुमारे २१५ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता, मात्र तो आजही मंजुरीच्या प्रतीक्षेत धूळ खात पडला आहे... याशिवाय, ४.५ MLD क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला असतानाही तो मागील पाच वर्षांपासून बंद आहे.. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोपही संघर्ष ग्रुपने केला आहे...मागील वर्षी ८ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते, मात्र तेही शासनस्तरावर रखडलेले आहे... दरम्यान, धरणातील जॅकवेल तुटलेल्या अवस्थेत असून गाळ प्रचंड प्रमाणात साचला आहे, त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे...“रायगड जिल्हा परिषदेचा यावर्षीचा अर्थसंकल्प १७५ कोटींचा आहे... त्यात ५ कोटींची तरतूद करणे काही अवघड नाही... उगाच १५-२० कोटींच्या घोषणा करून नागरिकांची दिशाभूल करण्यापेक्षा तात्काळ प्रत्यक्ष काम सुरू करावे,” असा थेट टोला संघर्ष ग्रुपने लगावला आहे... उमटे धरण हे स्वतः जिल्हा परिषदेच्या मालकीचे असताना देखील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का, असा सवाल उपस्थित करत, “पिण्याच्या पाण्यापेक्षा मोठा प्रश्न कोणता?” असा संतप्त प्रश्नही निवेदनातून विचारण्यात आला आहे...
दरम्यान, धरणातील गाळ तात्काळ काढून शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा उमटे धरण संघर्ष ग्रुप, रायगड यांच्या वतीने देण्यात आला आहे..
