पत्रकार कैलासराजे घरत (खारपाडा पेण): राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी भूषवले. बैठकीच्या प्रारंभी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्याचा आढावा देत परिचय सादर केला. यावेळी उरण तालुका अध्यक्ष प्रवीण नाईक यांचा नुकताच वाढदिवस झाल्याने, संघ परिवारासोबत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. बैठकीदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सतत बैठकीस गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पदे रद्द करून त्यांच्या जागी नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला. यासाठी रायगड जिल्हाध्यक्ष व सचिवांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच पनवेल तालुक्यात अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष व सचिव यांची नियुक्ती करण्यात आली. पनवेल शहर व तालुकास्तरावर विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या असून, येणाऱ्या काळात आणखी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. रायगड जिल्हा हा संघटनेचा जन्मस्थळ असल्यामुळे जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या प्रमाणात संघात सहभागी होत असून, रायगड जिल्हा महाराष्ट्रात आदर्श (आयकॉन) बनवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. प्रवीण नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या निष्ठावंत व संघटनेप्रती संवेदनशील कार्याची प्रशंसा केली. यावेळी भावुक होत प्रवीण नाईक यांनी सर्वांचे आभार मानत, “आपले प्रेम व आशीर्वाद असेच कायम राहू द्या,” अशी भावना व्यक्त केली. रायगड जिल्हा संपर्कप्रमुख कैलास राजे घरत यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत, “ही संघटना नसून आपले कुटुंब आहे,” असे सांगत संघटनेचा अभिमान व्यक्त केला...
बैठकीच्या शेवटी विजय सूर्यवंशी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले... तसेच प्रत्येक पदाधिकाऱ्याचा वाढदिवस शासकीय विश्रामगृहात साजरा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले... प्रमुख उपस्थिती संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य सचिव प्रीतमसिंग चौहान, राष्ट्रीय संपर्कप्रमुख झुंबरसिंग पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष धनाजी पुदाले, जिल्हा सचिव राजपाल शेगोकार, कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख कैलास राजे घरत आदी उपस्थित होते...
