महाराष्ट्र वेदभुमी

सीमाभागासाठी रायगड माणगावात एकजूट; पत्रकारांनी दाखवला लढाऊ बाणा.

माणगाव :- (नरेश पाटील): महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा केवळ भौगोलिक प्रश्न नसून मराठी अस्मिता, भाषा आणि हक्कांचा जाज्वल्य विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य मागण्यांना बळ देण्यासाठी आता रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील पत्रकारही पुढे सरसावले असून त्यांनी एकजूट दाखवत स्वाक्षरी मोहिमेद्वारे ठोस पाठिंबा तिसरा टप्पा अंतर्गत दर्शविला आहे...

महाराष्ट्र एकीकरण समिती (एमईएस), बेळगाव यांच्या दीर्घकालीन सीमावादाच्या न्याय मागणीसाठी माणगाव येथील पत्रकारांनी एकत्र येत स्वाक्षरी मोहिमेला नैतिक व ठोस पाठिंबा दिला. सोमवार संध्याकाळी माणगाव शहरात अनेक ज्येष्ठ व नामांकित पत्रकार एकत्र येत या मोहिमेत सहभागी झाले...

या अनुषंगाने माणगाव तालुका प्रेस क्लबचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार पद्माकर उभारे यांच्या निवासस्थानी पत्रकार एकत्र जमले होते. यावेळी माणगाव तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष सुतार, गौतम जाधव, पद्माकर उभारे, प्रभाकर मसुरे सर, भाऊ विनोद सापळे, सुनील राजभर, सौ. आरती महामुणकर, उत्तम तांबे, विश्वास गायकवाड, एस. वनारसे, हरेश मोरे आदी पत्रकारांनी उपस्थित राहून स्वाक्षरी करून आपला पाठिंबा दर्शविला...

यावेळी वृत्तपत्रकार नरेश पाटील यांनी उपस्थित पत्रकारांना या स्वाक्षरी मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. सीमाभागातील मराठी पत्रकारांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचा उद्देश, त्यामागील भूमिका व मराठी भाषिकांच्या हक्कासाठी उभे राहण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. तसेच माणगाव येथील पत्रकारांनीही या चळवळीला साथ देत स्वाक्षरी करून ऐक्य दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले...

या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित पत्रकारांनी स्वाक्षरी करून एमईएसच्या मागणीला पाठिंबा दिला व मराठी बांधवांच्या हक्कासाठी एकजूट असल्याचा ठाम संदेश दिला... यावेळी सर्वांनी एकमुखाने या चळवळीला पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला...

दरम्यान, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वाक्षरी करून पाठिंबा दर्शविलेल्या सर्व पत्रकारांचे नरेश पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले... मराठी अस्मिता आणि हक्कांच्या लढ्यात माणगावातील पत्रकारांनी दाखविलेल्या एकजुटीबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली...

विशेष म्हणजे, ही स्वाक्षरी मोहीम आता रायगड जिल्ह्यात वेगाने बळ घेत असून तिचा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही मोठ्या संख्येने पुढे येत आपला पाठिंबा दर्शवत आहेत... तसेच या चळवळीचा विस्तार होत असून लातूर जिल्ह्यातही लवकरच स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे... एकूणच सीमावादाचा मुद्दा आता व्यापक पातळीवर पसरत असून त्याला वाढता जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे...

एकूणच, सीमावादाचा प्रश्न आता केवळ सीमाभागापुरता मर्यादित न राहता राज्यभर पसरत असल्याचे स्पष्ट होत आहे. माणगावातील पत्रकारांनी दाखविलेली ही एकजूट आणि लढाऊ भूमिका मराठी हक्कांच्या लढ्याला नवे बळ देणारी ठरत असून, रायगड ते लातूर असा विस्तार घेत असलेली ही स्वाक्षरी मोहीम येत्या काळात अधिक व्यापक होऊन जनआंदोलनाचे रूप धारण करण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post