अलिबाग (ओमकार नागावकर) : पनवेलहून अलिबाग, रेवदंडा, मुरुड आणि वडखळ या भागात जाणाऱ्या प्रवाशांना रात्री ८ ते ८.३० नंतर एसटी बस उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय... या वेळेनंतर नियमित बस सेवा थांबत असल्याने प्रवाशांना इतर अनियमित गाड्यांवर अवलंबून राहावे लागते... मुंबईहून कामानिमित्त येणाऱ्या चाकरमान्यांना रात्री उशिरा आल्यानंतर राहण्यासाठी लॉज शोधावी लागते किंवा एसटी स्थानकातच रात्र काढावी लागते... या समस्येमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरलीय... सामाजिक कार्यकर्ते देवव्रत विष्णू पाटील यांनी सांगितले की, “स्थानिक लोकप्रतिनिधी एसटीने प्रवास करत नसल्याने त्यांना नागरिकांच्या अडचणींची जाणीवच होत नाही...”
वडखळ प्रवाशांचे हाल; वाहतूक सुविधांची कमतरता
रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या वडखळ गावातही एसटी सेवेकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे... रात्री ९ नंतर पनवेलहून वडखळकडे जाण्यासाठी अलिबाग मार्गाव्यतिरिक्त इतर बस थांबत नसल्याची तक्रार प्रवासी राजेश म्हात्रे यांनी केलीय...
प्रवाशांनी विनंती करूनही अनेकदा कंडक्टर नकार देतात, तसेच काही बस स्थानकात थांबतच नाहीत, असेही त्यांनी सांगितले...
लोकप्रतिनिधींविषयी वाढती नाराजी
या प्रश्नावर खासदार, आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्यांकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे... “निवडून दिलेल्या प्रतिनिधींना जाब विचारावा,” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे... देवव्रत पाटील यांनी वडखळ, अलिबाग, रेवदंडा आणि मुरुडसाठी अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी केली आहे...
डेपो व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
पनवेल व अलिबाग एसटी डेपोच्या कामकाजावरही संशय व्यक्त केला जात आहे... खासगी वाहनचालक प्रवाशांकडून जादा भाडे (सुमारे ३०० रुपये) आकारून त्यांची लूट करत असल्याच्या तक्रारी आहेत... काही नागरिकांनी एसटी अधिकाऱ्यांसोबत संगनमत असल्याचाही आरोप केला आहे...
तसेच, डेपोमधील संपर्क क्रमांक कायम व्यस्त किंवा बंद असतात आणि अधिकाऱ्यांचे वर्तन उद्धट असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत...
प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या; तातडीच्या उपाययोजनांची गरज
शासनाकडून चांगल्या सेवांची अपेक्षा असताना प्रत्यक्षात एसटी सेवा कोलमडलेली दिसत आहे... चालक व कंडक्टरांची कमतरता, जुन्या बस आणि विस्कळीत वेळापत्रक यामुळे प्रवासी त्रस्त आहेत... रात्रीच्या अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करणे, वडखळ येथे बस थांबे वाढवणे आणि डेपोमधील गैरप्रकारांची चौकशी करणे, या मागण्या आता जोर धरत आहेत...
