माणगाव :- (नरेश पाटील) : माणगाव तालुक्यात सुरू असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बे-मुदत संपाने आता निर्णायक टप्पा गाठला असून चौथ्या दिवशी आंदोलनाची तीव्रता अधिक वाढलेली दिसून येत आहे. प्रशासनाच्या भूमिकेबाबत वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर विविध घटक एकवटू लागले असून, पेन्शनर्स संघटनेच्या सक्रिय सहभागामुळे या आंदोलनाला नवी धार आणि व्यापकता प्राप्त झाली आहे...
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा रायगड, तालुका माणगाव यांच्या वतीने सुरू असलेल्या बे-मुदत संपाचा आज चौथा दिवस असून आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना, शाखा माणगाव यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून संपाला जाहीर पाठिंबा दिला...
दि. २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी, पेन्शनर्स संघटनेच्या शिष्टमंडळाने मा. तहसीलदार, माणगाव यांना निवेदन सादर केले. यावेळी राज्याध्यक्ष मा. संदीप नागे, जिल्हाध्यक्ष मा. शंकर पवार, बाळ उभारे, नारायण मालोरे तसेच मध्यवर्ती संघटनेचे माणगाव तालुका अध्यक्ष मा. राजेंद्र खाडे व राठोड साहेब यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते...
सदर निवेदनाद्वारे दि. 21 एप्रिलपासून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला असून पेन्शनर्स संघटनेने या लढ्यात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निवेदनात एकूण १६ प्रमुख मागण्यांचा समावेश असून ते मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव तसेच प्रधान वित्त सचिव यांना उद्देशून सादर करण्यात आले आहे...
दरम्यान, पेन्शनर्स संघटनेच्या आजच्या सहभागामुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाले असून हा लढा अधिक व्यापक, प्रखर आणि तीव्र स्वरूप धारण करत आहे... यामुळे शासनाने तातडीने दखल घेऊन कर्मचाऱ्यांच्या व पेन्शनर्सच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे असल्याची भावना तीव्र होत असून, अन्यथा येणाऱ्या काळात हे आंदोलन आणखी उग्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत...
