माणगाव :-(नरेश पाटील) : समाजातील महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि समानतेचा संदेश देणारा जागतिक महिला दिन माणगाव येथे अमरदीप संस्थेच्या वतीने शनिवारी दि. 14 (मार्च, 2026) रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ‘समतेच्या वाटेनं तू याव’ या प्रेरणादायी घोषवाक्याखाली आयोजित या कार्यक्रमाने महिलांना नव्या उमेदीने पुढे जाण्याची दिशा दिली...
या कार्यक्रमात विविध वाड्यांमधून सुमारे १२० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सि. कमळा (प्रेमांजली ट्रस्ट, महाड), सर्व विकास दीप संस्थेचे डायरेक्टर फा. थोमस, सि. नम्रता, सेंटर फॉर सोशल ॲक्शनचे ॲनिमेटर ॲड. सचिन वाघ, तसेच सर्व विकास दीपचे ॲनिमेटर महेश मोरे व स्वाती मोरे उपस्थित होते.
मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन करताना समाजातील महिलांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी स्वतः पुढाकार घेतल्यास समाज प्रगतीच्या दिशेने कसा वेगाने पुढे जाऊ शकतो, याची जाणीव करून दिली. ‘समतेच्या वाटेनं तू याव’ या संदेशातून महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि स्वावलंबनाचा ठाम आग्रह व्यक्त करण्यात आला...
कार्यक्रमात महिलांनी नृत्य सादर करून तसेच विविध खेळांमध्ये सहभाग घेत आपल्या कलागुणांना वाव दिला. सहभागी महिलांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित महिलांना भेटवस्तू देत सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले...
अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून त्या समाजाच्या मुख्य प्रवाहात अधिक सक्षमपणे सहभागी होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले. समतेचा संदेश केवळ घोषवाक्यापुरता मर्यादित न राहता तो कृतीत उतरवण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी व्यक्त केला आणि या सकारात्मक वातावरणात कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला...
