पत्रकार कैलासराजे घरत रायगड जिल्हा प्रतिनिधी
रायगड-अलिबाग, दि. ०१/०१/२०२६(जिमाका) :-कारागृहातील बंदी सुटून गेल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यांचा व त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा, याउद्देशाने अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व विषेश कारागृह महानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त बंद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांकरीता कौशल्य विकास कार्यक्रम (DPC २०२५-२६), जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अलिबाग, जिल्हा उद्योग केंद्र, अलिबाग यांच्यामार्फत पुरुष बंद्यांना दुचाकी मोटार सायकल दुरुस्ती व महिला बंद्यांकरीता ब्युटिपार्लर बेसीक व अॅडव्हांन्स कोर्सचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले...
यावेळी सचिव जिल्हा विधीसेवा प्राधिकरण,रायगड-अलिबाग श्रीम.तेजस्विनी निराळे, जिल्हा कौशल्य उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार, अधीक्षक,अलिबाग जिल्हा कारागृह विशाल बांदल यांच्यासह जिल्हा उद्योग केंद्रांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते...
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, कारागृह विभागाच्या “सुधारणा व पुनर्वसन” या ब्रिद वाक्याचा उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीने किमान कौशल्य विकास डिपीसी-२०२५-२६ अंतर्गत अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांकरीता कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. कारागृहातील बंदी सुटून गेल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी... बंद्यांचा, स्वत:चा व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा या उद्देशाने जास्तीत जास्त बंद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा कारागृह प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. ग्रामीण प्रगती फाऊंडेशन व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने बंद्यांकरीता हेल्थ केअर सेक्टर अंतर्गत Home Health Trainee या कोर्ससाठी बंद्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणातून बंद्यानी चांगले प्रशिक्षण घेवून आपले जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करावा... तसेच प्रत्येक बंद्यांनी आपल्या आरोग्याच्या सोयी-सुविधांसाठी आयुष्यमान कार्ड काढून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले... ज्या बंद्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांनी प्रशिक्षणासाठी आपला सहभाग नोंदवून प्रशिक्षण घ्यावे...
सचिव जिल्हा विधीसेवा प्राधिकरण,रायगड-अलिबाग श्रीम.तेजस्विनी निराळे यांनी सांगितले की, नियमित जीवन जगताना कायदा खूप महत्वाचा असतो... ज्या बंद्यांनी प्रशिक्षण पूर्ण करुन प्रमाणपत्र मिळविले आहे त्यांची प्रेरणा घेवून इतर जास्तीत जास्त बंद्यांनी घेवून हे प्रशिक्षण पूर्ण करावे. बंद्यांनी जागरुकतेने आपल्याला असलेल्या सोयी-सुविधा मिळविण्याचा प्रयत्न करावा. रोजगाराच्या वेगवेगळया संधी उपलब्ध असल्याने हे प्रशिक्षण बंद्यांनी घेतल्यास बंदी आत्मनिर्भर होवून त्यांना रोजगार उपलब्ध होईल...
