पेंच पाटबंधारे विभागाची मात्र मुखदर्शकाची भूमिका
शेतकरी, नागरिकांवर संकटाची टांगती तलवार
प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक :- तालुक्यातील पेंच पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत नगरधन ते नवरगाव दरम्यानचा मोठा कालवा सध्या जीर्ण अवस्थेत असुन फुटण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे... मायनरच्या भिंतींना जागोजागी मोठ्या भेगा पडल्या असून, पावसाळ्यात पाण्याचा दाब वाढताच या भिंती कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे... या कालव्यालगत असलेली शेतजमीन व त्यावरील उभ्या पिकांवर मोठे संकट ओढावले असताना, रामटेकचे पेंच पाटबंधारे जलसंपदा विभाग मात्र मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याचा आरोप माजी पं.स. सदस्य शंकर होलगीरे सह शेतकऱ्यांनी केला आहे... परिसरातील शेतकऱ्यांच्या माहितीनुसार या कालव्याची निर्मिती अंदाजे सन १९८० मध्ये करण्यात आली होती... एवढ्या वर्षांनंतरही कोणतीही ठोस दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी न झाल्याने कालव्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे... येत्या पावसाळ्यात कालवा फुटल्यास शेतातील पिके वाहून जाऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणे अटळ असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे... मोठ्या कालव्याच्या मायनरचे तातडीने नव्याने बांधकाम करण्यात यावे, असे निवेदन पं.स. सदस्य शंकर होलगिरे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे... दरम्यान, प्रशासनाच्या दुर्लक्षाचे आणखी एक गंभीर उदाहरण रामटेक-चिचाळा मार्गावर पाहायला मिळत आहे... पेंच जलाशयाच्या मुख्य डाव्या कालव्याला जोडलेल्या उपकालव्यावरील पूल देखभाल व दुरुस्तीअभावी वाकला असून तो जीवितहानीचा सापळा ठरत आहे... धोका ओळखून पेंच पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विवेक झाडे यांनी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून दि.१३ सप्टेंबर२०२५ च्या दुपारपासून या पुलावरील जड व चारचाकी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला... मात्र, दुचाकी वाहतूक अद्यापही सुरूच असल्याने प्रशासनाच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे... हा पूल कोसळल्यास जीवितहानीची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे...
प्रवाशांची होते गैरसोय
रामटेक-चिचाळा हा मार्ग पुढे काचूरवाहीसह तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा कमी अंतराचा व सोयीचा मार्ग असल्याने येथे रहदारीचे प्रमाण मोठे आहे... मार्ग बंद झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असतानाही, पर्यायी व्यवस्था किंवा नव्या पुलाच्या कामाला अद्याप गती मिळालेली नाही...
कालवा फुटण्याचा धोका
वाकलेल्या पुलावरून सुरू असलेली दुचाकी वाहतूक आणि प्रशासनाचे बघ्याचे धोरण - या साऱ्या बाबी मिळून रामटेक तालुक्यावर मोठ्या संकटाची छाया पसरली आहे... त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतर नव्हे, तर त्याआधीच प्रशासनाने जागे होऊन कालव्याच्या मायनरचे व पुलाचे तातडीने नव्याने बांधकाम करावे, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे...
