शेतकरी हितासाठी रामटेक बाजार समिती सरसावली
शेतकऱ्यांची फसवणुक टाळण्यासाठी सभापती किरपान यांचे प्रभावी पाऊल
प्रतिनिधी: सचिन चौरसिया
रामटेक :- शेतकऱ्यांनी आपला शेतमाल अधिकृत बाजार समितीतच विकावा आणि फसवणूक टाळावी, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, रामटेक तर्फे अनोखी शक्कल लढवत एक अनोखी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात गेल्या १५ दिवसांपासून एक विशेष 'माहिती रथ' फिरवून लाऊडस्पिकरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जागरूक करण्यात आले. यावेळी माहीतीचा समावेश असलेली हस्तपत्रके वाटप करण्यात आली. या मोहिमेला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
गावगावात घुमला बाजार समितीचा आवाज
शेतकऱ्यांना बाजार समितीच्या नियमांची आणि फायद्यांची माहिती थेट त्यांच्या बांधापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने सभापती सचिन किरपान यांच्या संकल्पनेतून हा माहिती रथ तयार करण्यात आला होता. गेल्या दोन आठवड्यांपासून हा रथ तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचला. लाऊडस्पिकरद्वारे गाणी आणि घोषणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमालाची प्रतवारी, ओलावा तपासणी आणि इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
माहिती रथाद्वारे दिलेले महत्त्वाचे संदेश
फसवणूक टाळा: खासगी किंवा अवैध व्यापाऱ्यांना माल विकण्याऐवजी बाजार समितीच्या आवारातच माल विकावा. मालाची प्रतवारी (ग्रेडींग) धान, गहू, तूर, चना यांसारखा माल नीट वाळवून, साफ करून आणि प्रतवारी करून आणल्यास अधिक भाव मिळतो...
पारदर्शक व्यवहार: समितीच्या आवारात माल आणल्यावर 'आवक रजिस्टर'मध्ये नोंद करणे,आडत्या कडून पोचपावती व सौदापट्टी घेणे अनिवार्य आहे.
अचूक वजन: बाजार समितीत इलेक्ट्रॉनिक काट्याद्वारे वजन केले जात असल्याने शेतकऱ्यांची वजनात घट होत नाही.
शेतकरी हाच बाजार समितीचा 'श्वास'
"शेतकरी हा आमच्या बाजार समितीचा खऱ्या अर्थाने 'श्वास' आहे. त्यांच्या कष्टाच्या पैशांची चोरी होऊ नये आणि त्यांना हक्काचा मोबदला मिळावा, यासाठी आम्ही हा माहिती रथ १५ दिवस फिरवून जनजागृती केली आहे. शेतकऱ्यांच्या सोयी- सुविधेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत."
सचिन किरपान, सभापती, कृ.उ.बा. स. रामटेक
बाजार समितीने केवळ नोटीस न काढता थेट रथाच्या माध्यमातून संवाद साधल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शासनाच्या विविध अनुदान योजनांचा लाभ मिळण्यासाठी बाजार समितीतील विक्रीची नोंद अत्यंत महत्त्वाची ठरते, ही बाबही या मोहिमेत अधोरेखित करण्यात आली. शिवाययामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळेल.
