प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक :- पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली वनपरिक्षेत्रात वर्षाच्या अखेरच्या दिवशी पर्यटकांना निसर्गाचे अविस्मरणीय अनुभव आणि थरारक वाघांचे दर्शन घडले. जंगलातील प्रमुख वाघ टि-९८ आणि टि-१०८ यांनी एकाच दिवशी दर्शन दिल्याने जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला. वाघांच्या नियमित दर्शनासाठी ३१ डिसेंबर रोजी चोरबाहुली गेटवरून सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना दुर्मिळ असा अनुभव मिळाला. याच सफारीदरम्यान वाघ टि-१०८ ने सांभराची शिकार केल्यानंतर भक्ष्य खातानाचे थरारक दृश्य पर्यटकांनी प्रत्यक्ष पाहिले. जंगलातील नैसर्गिक जीवनचक्राचा हा क्षण अनेक पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून, ही सफारी वर्षातील सर्वात संस्मरणीय ठरल्याचं पर्यटकांनी सांगितलं. चोरबाहुली गेट परिसरातील समृद्ध जैवविविधता, वाघांचे नैसर्गिक वर्तन आणि सुरक्षित सफारी व्यवस्थेमुळे पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत आहे. येथे मिळणाऱ्या नियमित वाघदर्शनामुळे पेंच व्याघ्र प्रकल्प पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे उभा राहत आहे. वर्षाच्या अखेरच्या दिवशी लाभलेले हे वाघदर्शन पर्यटकांसाठी केवळ एक सफारी अनुभव न राहता, निसर्गाशी थेट जोडणारा आणि कायम स्मरणात राहणारा क्षण ठरला आहे.
सफारी अनुभवांपैकी सर्वात अविस्मरणीय क्षण
हरकिरत सिंग कलसी यांना सफारीत वर्षाच्या शेवटच्या दिवशी मिळालेले हे वाघदर्शन माझ्या आतापर्यंतच्या सर्व सफारी अनुभवांपैकी सर्वात अविस्मरणीय ठरले. टि-९८ आणि टि-१०८ या दोन्ही वाघांचे एकाच दिवशी दर्शन, तसेच टि-१०८ ने शिकार केल्यानंतर भक्ष्य खातानाचे दृश्य प्रत्यक्ष पाहणे हा थरारक क्षण होता. जिप्सी चालक सिद्धार्थ नारनवरे आणि गाईड अंकित निकुरे यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे हा अनुभव अधिक खास झाला.”
पर्यटकांसाठी सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध
“उपसंचालक अक्षय गजभिये आणि सहाय्यक वनसंरक्षक पूजा लिंबगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांच्या नेतृत्वात चोरबाहुली गेटच्या सौंदर्यकरणाचे काम वेगाने सुरू आहे. भविष्यात पर्यटकांसाठी सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. सुरक्षित आणि संस्मरणीय सफारी अनुभव देण्यासाठी वन विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.”
