उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले
प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कांद्री माईन रेल्वे लाईन गावाजवळ भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या रस्त्यालगत कोसळला असून नर बिबट्या गंभीर जखमी होण्याची घटना सोमवार (दि.१५) डिसेंबरला सकाळी ०७ वाजता घडली... पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथील वन्यजीवी उपचार केंद्रात हलविण्यात आले आहे... कांद्री माईन रेल्वे लाईन परिसराजवळील रस्ता ओलांडत असताना देवलापारकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली... त्या धडकेत बिबट्या रस्त्यालगत कोसळला आणि तो गंभीर जखमी झाला... झालेल्या घटनेची माहिती मिळताच मनसरचे वनक्षेत्र सहाय्यक मुनेश्वर गोंडीमेश्राम यांनी तात्काळ दखल घेत वनरक्षक रेखा चोंदे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले... वन विभागाच्या पथकाने परिस्थितीचा आढावा घेत जखमी बिबट्याला तातडीने उपचारासाठी नागपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात हलविले. सध्या बिबट्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या घटनेमुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे...
