रोहा बदलतोय आता कोलाड नाका सुद्धा बदलणार
प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव: गावातील जुने राजकारण, विकासाविना आश्वासनं आणि युवकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष याला कंटाळलेल्या वरसगावमधील युवकांनी आता मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. नामदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत वरसगावातील असंख्य युवकांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गटात) जोरदार प्रवेश केला असून, तटकरे गटाच्या बालेकिल्ल्यात राजकीय खळबळ उडाली आहे. कोलाड येथील उत्तुंग नेतृत्व सुरेश दादा महाबळे यांच्या धडाकेबाज प्रवेशाच्या अनुषंगाने आज युवकांचा प्रवेश अमोल सानप (वरसगाव) यांच्या नेतृत्वाखाली झाला. गावातील तरुणांनी एकजुटीने शिंदे गटाचा झेंडा हाती घेत “आता विकासासाठी आम्हीच पुढे!” असा निर्धार व्यक्त केला...
गावातील तरुणांनी स्पष्टपणे सांगितले की, वरसगाव ग्रामपंचायत ही तटकरे गटाची हुकमी पंचायत मानली जाते. मात्र गावातील ८० टक्के युवक बेरोजगार आहेत, काही धाटाव MIDC मध्ये रोजंदारीवर काम करतात. त्यांच्या अडचणी गावातील पुढारी वरच्या पातळीपर्यंत पोहोचू देत नाहीत. निवडणुकीत पार्टी आणि आश्वासनं मिळतात, पण काम मात्र काही होत नाही. या परिस्थितीविरोधात बंड पुकारत युवकांनी आता नव्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत अजून ५० ते ६० युवक नामदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वात अधिकृत प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत...
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रोहा तालुक्यात शिंदे गटाकडून अनेक प्रवेश सुरू असून युवकांचा ओघ वाढत आहे. अशा परिस्थितीत कोलाड नाक्यावरील युवकांचा प्रवेश हा निर्णायक ठरणार असल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे...
रोहा परिसरात आणि कोलाड नाका भागात “रोहा बदलतोय” या ठळक घोषवाक्यांचे बॅनर झळकत आहेत आणि आता “कोलाड नाका सुद्धा बदलणार!” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तटकरे गटाचा “हक्काचा बालेकिल्ला” मानला जाणारा वरसगाव आता शिंदे गटाच्या दिशेने झुकताना दिसत आहे. त्यामुळे रोहा तालुक्यातील आगामी निवडणुकांमध्ये गणित मोठ्या प्रमाणात बदलणार असल्याची कुजबुज सुरू झाली आहे...
