रायगड जिल्हा प्रतिनिधी कैलासराजे घरत
अलिबाग येथील वरसोली विठोबाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी..! १८३ वर्षांची परंपरा जपणारी.. वरसोली विठोबाची यात्रा आवर्जून पाहावी..."
अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील वार्षिक विठोबाची यात्रा सुरू झाली आहे... ताकई साजगाव खोपोली येथील बोंबल्या विठोबाच्या यात्रेनंतर रायगड जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावरची मोठी यात्रा मानली जाते... यात्रेत सुमारे ५००–६०० छोटी-मोठी दुकाने, गर्दीला मनोरंजनाचे वेगवेगळे स्वरूप देत आहेत...कार्तिक वैद्य एकादशी पासून अमावस्येपर्यंत पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत मोठी उलाढाल होते आणि केवळ अलिबाग तालुका नव्हे तर रायगड आणि इतर जिल्हातील भाविक भक्त मोठ्या संख्येने या यात्रेत येत असतात...
नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये येणारे पर्यटक पाहुणे देखील या यात्रेचा मनमुराद आनंद घेतात; स्थानिक सूत्रांनुसार या काळात सुमारे ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल होत असल्याचे समजते...
यात्रेतील भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून वीज, पाणी व शौचालयांसह लागणारी मूलभूत सोय अलिबाग नगरपालिका, वरसोली ग्रामपंचायत आणि देवस्थानाच्या माध्यमातून व्यवस्थित केली जाते... या यात्रेला सुमारे १८३ वर्षांची परंपरा असून त्यामागे ऐतिहासिक पार्श्वभूमीही आहे... सांगितले जाते की सुमारे १८४० साली मंदिराला रंगरंगोटी करत असताना शिखर कोसळून तसेच इतर अनिष्ट प्रसंगांमुळे स्थानिकांनी विठ्ठल मंदिर परिसरात याच धार्मिक यात्रेची सुरूवात केली आणि ती आजतागायत अविरत सुरू आहे...
ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले वरसोली गावातील श्री विठोबा मंदिराची उभारणी राघोजी आंग्रे यांनी केली होती... सन १७७८ मध्ये सरखेल कान्होजी आंग्रे यांची सून नर्मदा आंग्रे यांनी विठोबा, रुख्माई आणि गरुड देवतेची मूर्ती प्रतिष्ठापना केली... मूर्तीच्या झिजेपणामुळे नंतर १५ ऑक्टोबर २००७ रोजी नवीन गंडकी पाषाणात तयार केलेली मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली... मंदिराच्या आजूबाजूला सभागृह, पालखी गृह व गरुडखांब आहे, स्थानिक श्रद्धा आहे की गरुडखांबाला आलिंगन दिल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात... पूर्वी ही यात्रा केवळ मंदिर परिसरात भरायची, पण नागरीकरणामुळे आता यात्रा विस्तारित पद्धतीने राननाथ कुंभारआळी पासून वरसोलीपर्यंत भरली जाते... पाच दिवसांच्या या यात्रेत प्रार्थना, सत्यनारायण पूजा, सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते... शेतकरी, व्यापारी आणि आजूबाजूच्या वस्तीतील आगरी, कोळी, कराडी, माळी, कुंभार आदी जमातींचे लोक भाजीपाला, कडधान्ये, टोबले, मडक्या व इतर वस्तू विक्रीसाठी यामध्ये सहभागी होतात त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो...
हा पाच दिवसांचा उत्सव हसत-खेळत आणि गोड-चवांसह उत्साहात चालून जातो... अतिशय हर्ष उल्हासात ही यात्रा संपन्न झाली...
