सेवा शुल्क वाढवा, अन्यथा गॅस पुरवठा ठप्प
एलपीजी वितरकांचा सरकारला इशारा
प्रतिनिधी: सचिन चौरसिया
रामटेक:- सेवा शुल्कात कोणतीही वाढ न झाल्यामुळे आणि वाढत्या महागाईच्या झटक्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एलपीजी वितरकांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. रामटेकसह संपूर्ण जिल्ह्यातील वितरकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सेवा शुल्कात तातडीने वाढ करण्याची मागणी केली. अन्यथा येत्या ६ नोव्हेंबरपासून एलपीजी गॅस पुरवठा ठप्प ठेवण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. मनसर येथील भारत गॅस वितरकाचे संचालक शाम गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. त्यांनी सांगितले की, “वाहतूक, मजुरी, देखभाल आणि कार्यालयीन खर्चात गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. मात्र, तेल कंपन्यांनी वितरकांना मिळणाऱ्या सेवा शुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही. या परिस्थितीत विद्यमान दरात व्यवसाय चालवणे शक्य नाही.”
वितरकांनी पुढे नमूद केले की, “ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, परंतु आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर मागणी मान्य केली नाही, तर गॅस पुरवठा बंद करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही.” या इशाऱ्यामुळे ग्राहकवर्गात चिंता पसरली आहे. दररोजच्या घरगुती वापरातील एलपीजी गॅस पुरवठा ठप्प झाल्यास मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. वितरकांच्या मागणीवर तेल कंपन्यांचा निर्णय काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
मागील ५ वर्षांपासून शुल्कात वाढ नाही
वितरकांच्या मते, महागाई वाढल्याने गॅस सिलिंडरच्या किंमती वाढत आहेत, तरीही गेल्या पाच वर्षांपासून सेवा शुल्कादरात वाढ झालेली नाही. वारंवार मागणी करूनही, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. लोकांना होणारी गैरसोय वाढतील. वितरकांनी इशारा दिला आहे की जर त्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण झाल्या नाहीत तर ६ नोव्हेंबरनंतर गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला जाईल...
